नागपूर - लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासन आणि अनेक सामाजिक संस्थांकडून अडचणीत सापडलेल्यांना मदत केली जाते आहे. यात अन्याय झालेल्यांना न्याय देण्याची भूमिका बजाविणारे न्यायाधीशदेखील पुढे सरसावले आहेत. नागपुरात मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश संजय मेहेरे यांच्या पुढाकारातून ५०० गरजूंना सात टन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
न्यायमूर्ती मेहरे यांच्या पुढाकारातून निधी गोळा करण्यात आला. त्यानंतर विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आणि वरिष्ठ पातळीचे दिवाणी न्यायाधीश अभिजित देशमुख यांनी स्वयंसेवकांच्या मदतीने शहरातील विविध भागांतील गरजूंना सर्वप्रथम शोध घेतला. त्यानुसार लकडगंज येथील गंगाजमुना परिसर, मोती बागेतील खलाशी लाईन आणि राणी दुर्गावती चौक मदतीसाठी निश्चित करण्यात आला. प्रामुख्याने, गंगाजमुना परिसरातील देहविक्री करणाऱ्या महिलांना मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली. साहित्याचे वितरण करण्यासाठी महिला आणि बाल विकास अधिकारी अपर्णा कोहळे, जिल्हा बाल संरक्षक अधिकारी मुश्ताक पठाण, पोलीस निरीक्षक हिवरे, स्वयंसेवक डॅनियल आणि सामाजिक कार्यकर्ते इरफान खान यांनी वितरण कामात मदत केली. न्यायाधीशांनी केलेल्या या उपक्रमाचे लाक्कडगंज, मोतीबाग आणि राणी दुर्गावती चौक परिसरासह शहरातून कौतुक होत आहे.