पणजी (गोवा) - गोव्यात राज्यस्तरीय संचारबंदीमध्ये सात जूनपर्यंत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आता ही माहिती दिली. कोविडचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटत आले असले तरी कोविडने मृत्यू पावणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अद्यापही चिंताजनक आहे. त्यामुळे संचारबंदीबाबत या साऱ्या गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
संचारबंदीला 7 जूनपर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत मुदतवाढ
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आहे त्या स्थितीतच राज्यातील संचारबंदीला 7 जूनपर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी पातळीवर तसे आदेश जारी केले जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. गोव्यामध्ये सध्या संचारबंदी आहे. सकाळी सात ते दुपारी एक या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली असतात. उद्योगधंदे सुरू आहेत. साप्ताहिक बाजार आणि मासळी बाजार बंद आहेत. सिनेमागृहे, थिएटर्स, तरण तलाव आणि सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम तसेच जाहीर कार्यक्रम बंद आहेत. 7 जूनपर्यंत हे निर्बंध तसेच राहणार, असेही त्यांनी सांगितले.
मृत्यू पावणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अद्यापही चिंताजनक
दरम्यान राज्यात कोविडचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटत आले असले तरी कोविडने मृत्यू पावणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अद्यापही चिंताजनक आहे. त्यामुळे संचारबंदीबाबत या साऱ्या गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जनतेने सरकारला सहकार्य करतानाच नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.