सिंधदुर्ग - मालवण तालुक्यातील तारकर्ली येथे एकाच ठिकाणी कोब्रा जातीची तब्बल 23 पिल्ले आढळून आली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात पिल्ले मिळण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. 'वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्यू सिंधुदुर्ग' या संस्थेच्या सदस्यांनी या पिल्लांची सुटका करत त्यांना वनविभागाकडे सुपूर्द केले आहे.
तारकर्ली येथे प्रवीण मयेकर यांच्या गणेशमूर्ती शाळेत कोब्रा जातीचे पिल्लू दिसल्याची माहिती वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्यू टीमला स्थानिकांनी दिली. त्यानुसार त्यांच्या टीमचे सदस्य गणेशमूर्ती शाळेत दाखल झाले. त्यांनी शोध घेतला असता कोब्रा जातीची एकूण 23 पिल्ले आढळून आली. या पिल्लाना वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्यू टीमचे अध्यक्ष अनिल गावडे, सचिव वैभव अमृस्कर आणि नंदू कुपकर यांनी पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले.
वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, वनरक्षक तारिक फकीर, वनमजूर अनिल परब यांनी त्या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडले. आतापर्यंत कोब्रा जातीची एकाच ठिकाणी जास्तीजास्त 13 ते 14 पिल्लेच आढळल्याची नोंद आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी कोब्रा जातीची 23 पिल्ले सापडणे हा राज्यातील विक्रम असल्याचे वाईल्ड लाईफ संस्थेचे अध्यक्ष अनिल गावडे यांनी सांगितले.