नवी मुंबई - तळोजा येथे राहणारा तरुण बेपत्ता असल्याचा बनाव करत पत्नीला सोडून प्रेयसीसोबत पळाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आपल्याला कोरोना झाला असून, आपण जगणार नाही असेही त्याने पत्नीला खोटे सांगितल्याचे सत्य समोर आले आहे. मनीष मिश्रा (वय 28) असे या पतीचे नाव असून, तो आपल्या पत्नीला सोडून प्रेयसीसोबत मध्य प्रदेशातील इंदूर येथे पळून गेला होता.
हेही वाचा -...अन् मेसेज येताच अजित पवारांनी घेतला यू-टर्न!
24 जुलै रोजी सकाळी उरण जेएनपीटी येथे कामासाठी जात आहे, असे मनीष याने पत्नीला सांगून स्वतःच्या दुचाकीने घरातून निघाला होता. त्यानंतर रात्री पत्नीला फोन करून आपल्याला कोरोनाची लागण झाली असून, आता वाशी येथील लॅबजवळ असल्याचे खोटे सांगितले. तसेच आता मी जगणार नाही, असेही रडून पत्नीला सांगत होता. पत्नीने त्याची समजूत घातली व त्याला धीर दिला. मात्र, फोन सुरू असतानाच त्याने कॉल कट केला. त्यानंतर संबंधीत तरुणाचा फोन सतत बंद येत होता. यामुळे पत्नीने चिंतीत होऊन, ही बाब नातेवाईकांना सांगितली. नातेवाईकांनी बेपत्ता मनीष मिश्रा याचा शोध घेतला असता, वाशी सेक्टर 17 परिसरातील रस्त्याच्या कडेला त्याची दुचाकी चावीसह आढळली. त्याशिवाय ऑफिस बॅग, हेल्मेट या वस्तूही आढळून आल्या.
हेही वाचा - आजपासून एसटी १०० टक्के क्षमतेने सुरू... प्रवासीही योग्य खबरदारी घेऊन करतायत प्रवास
दरम्यान, यानंतर मनीष मिश्रा यांचा मेव्हणा सौरभ तिवारी याने मनीष बेपत्ता झाल्याची वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा वाशी पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असता, मनीष मिश्रा याचे अनैतिक संबंध असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. मनीष त्याच्या प्रेयसीसोबत कायमस्वरुपी इंदूर येथे राहण्यास गेला असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले. वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी संजीव धुमाळ यांच्या टीमने मनीषला प्रेयसीसह ताब्यात घेतले व 15 सप्टेंबरला नवी मुंबईत आणले असल्याची माहिती मिळाली आहे.