ठाणे - नऊ दिवसापूर्वी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करून एक पर्यावरणवादी तरुण 'सह्याद्री ते हिमालय' असा दोन हजार किलोमीटर अंतराच्या प्रवासाला पायी निघाला आहे. सिद्धार्थ गणाई (वय २४) असे या तरुणाचे नाव आहे. तो मुंबईतील अंधेरी येथील भवन महाविद्यालयातील टी.वाय. बीएस.सीमध्ये शिक्षण घेत आहे. सद्या तो भिवंडी तालुक्यातील बापगाव येथील मैत्रिकुल या मुलांच्या वसतिगृहात राहत आहे. सिद्धार्थ भर पावसात पर्यावरणाचा संदेश देत, रायगड ते सर्वोच्च शिखर असलेल्या हिमालयातील माउंट एव्हरेस्ट (सागर माथा) या ठिकाणी जाण्यास पायी प्रवासाला निघाला आहे.
- ७० दिवसात प्रवास पूर्ण करण्याची इच्छा -
सिद्धार्थ दिवसाला ३५ ते ४० किलोमीटर अंतर पायी प्रवासाने पार करतो. रायगडमधून सुरु केलेला पायी प्रवास ठाणे, नाशिक, मार्गे मध्यप्रदेश राज्यातून जाणार आहे. हा दोन हजार किलोमीटरचा पायी प्रवास ७० दिवसात पूर्ण करण्याची इच्छा सिद्धार्थने व्यक्त केली. विशेष म्हणजे त्याच्या या मोहिमेला कोणतीही शासकीय मदत मिळाली नसून त्याने स्वतःच पायी आपल्या स्वप्नंना गवसणी घातली आहे
- 'एक झाड माणुसकीचं, एक पाऊल परिवर्तनाच' -
२० जुलै २०२१ रोजी शिवरायांच्या समाधीला अभिवादन करून माउंट एव्हरेस्ट (सागर माथा) हे दोन हजार किलोमीटरचे अंतर तो चालत पार करण्यासाठी निघाला आहे. ''एक झाड माणुसकीचं, एक पाऊल परिवर्तनाचं'' हा सामाजिक उपक्रम राबवत सिद्धार्थ गणाई सामाजिक संदेश देत हिमालयाच्या वाटेने निघाला आहे. मुंबई - नाशिक महामार्गाच्या दिशेने सिद्धार्थ गणाई प्रवास करताच भिवंडी तालुक्यातील पडघा येथील युवा कवी मिलिंद जाधव यांनी सिद्धार्थ गणाई याचे स्वागत केले. यावेळी एक झाड लावून ''एक झाड माणुसकीचं, एक पाऊल परिवर्तनाचं'' हा सामाजिक उपक्रमात सहभागी झाले व त्याला पुढील प्रवाससाठी शुभेच्छा दिल्या.
- 'पण' मी स्वप्न सोडले नाही. तर मी एक जिद्द घेऊन पुढे निघालो -
निसर्गाची होत चाललेली कत्तल आणि निसर्गाचा कोप ही परिस्थिती मानवी जीवनावर येण्याचं मूळ कारण आपणच आहोत. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करणारे पण आपणच आहोत. यासाठी एक हा छोटा प्रयत्न करत असल्याची भावना सिद्धार्थ याने व्यक्त केली. शिवाय आपण सगळे माझ्या सोबत आहात हीच माझी ताकद आहे. पाच वर्षापूर्वी मी छोटंस स्वप्नं घेऊन निघालो होतो. की हिमालायच्या माउंट एव्हरेस्ट शिखरावर असल पाहिजे, परंतु आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ते मला कधीच शक्य झाले नाही. पण मी स्वप्न सोडले नाही. तर मी एक जिद्द घेऊन पुढे निघालो आहे. प्रवास माझा खडतर आहे. पण तुम्ही सगळे माझ्या सोबत असाल तर असंख्य झाडे आपण लावू शकतो मोहीम व माझे स्वप्नं देखील पूर्ण होईल.
- स्वतःचे आरोग्य जपत प्रवास -
सिद्धार्थ जेव्हा पुढच्या पायी प्रवासाला निघतो तेव्हा रस्त्यामध्ये चालत असताना दिसेल त्या नागरिकांना एक झाड लावून उपक्रमात सहभागी व्हा, असा संदेश देतो. तसेच सध्या कोरोनाचा काळ सुरु असल्याने स्वतःचे आरोग्य सांभाळण्यासाठी माझी राहण्याची व जेवणाची छोटीसी सोय आपण करावी. तुमच्या सहकार्याने माझे ध्येय व उपक्रम पूर्ण होईल, असे सिद्धार्थ गणाई याने 'ई टीव्ही भारत' प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
- सिद्धार्थच्या जीवन प्रवासाची गाथा -
पर्यावरणवादी सिद्धार्थ गणाईचे बालपण अत्यंत हलाखीत गेले आहे. सिद्धार्थ लहान असतानाच आई वडिलांचा घटस्फोट झाला. त्यावेळी पालन पोषणाची जबाबदारी वडिलांनी स्वीकारली. मात्र, वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने लहानपणी एक ते दोन वर्ष सिद्धार्थने मुंबईतील अंधेरी येथील एका पुलाखाली आपले बालपण काढले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने सिद्धर्थच्या आईचा शोध घेण्यात आला. त्यावेळी त्याची आई केरळ येथे असल्याने सिद्धार्थचे प्राथमिक शिक्षण केरळ येथे झाले. मात्र, २०११ पासून तो मुंबईत परतला. त्यानंतर मावशी व इतर नातेवाईकांनी त्याचा सांभाळ केला. सध्या तो भिवंडी तालुक्यातील तील बापगाव येथील मैत्रीकुल येथे राहत आहे. तो विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या विद्यार्थी भारती संघटनेचा सदस्य असून, येथूनच त्याला माउंट एव्हरेस्ट सर करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सिद्धार्थ गणाई याने 'ई टीव्ही भारत' प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
हेही वाचा - रश्मी शुक्ला यांचा गौप्यस्फोट! फोन टॅपिंग सरकारच्या परवानगीने केल्याचा न्यायालयात दावा