ठाणे - कल्याणातून 20 दिवसापूर्वी 25 वर्षीय तरुण बेपत्ता झाला होता. मंगळवारी त्याच्या मृतदेहाचा सांगाडा भिवंडी तालुक्यातील वाळसिंद येथील मुंबई महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रालगतच्या झुडूपात सापडल्याने त्याचा खूनाचा उलगडा झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - राजकीय पक्षांनी निवडणुकीआधी दिलेले आश्वासन 'फेल'; दिव्यातील अनधिकृत बांधकामे पाडण्यास विरोध
राजीव ओमप्रकाश बीडलान ( 25 रा. बेतुरकरपाडा, कल्याण ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो 21 ऑक्टोबरला घरातून बेपत्ता झाल्याने त्याच्या हरवल्याची नोंद 23 ऑक्टोबरला कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्याचा शोध सुरु असताना तपास अधिकारी पोलीस हवालदार धनंजय सोनावले यांनी गुप्त खबऱ्यामार्फत माहिती काढली असता, त्याचा खून करून मृतदेह भिवंडीत फेकून दिल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार मंगळवारी सकाळी भिवंडी तालुक्यातील वाळसिंद येथील मुंबई महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रालगतच्या झुडूपातुन त्याचा मृतदेहाचा सांगाडा ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय तपासणीसाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
हेही वाचा - मूल होत नाही म्हणून विवाहितेला बेदम मारहाण करून खोलीत डांबले; सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल
पोलीस सूत्रांनुसार, मृत राजीव हा ऍम्ब्युलन्स चालक म्हणून काम करत असताना त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्या रागातून त्या महिलेच्या पतीने अन्य 3 मित्रांच्या मदतीने राजीव याची हत्या करून मृतदेह भिवंडीतील वाळसिंद येथील मुंबई महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रालगतच्या झुडूपात फेकून दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. रात्री उशिरापर्यंत या खुनातील चारही आरोपींना महात्मा फुले पोलिसांकडून अटक करण्याची प्रक्रिया सुरु असल्याने त्यांची नावे समजू शकली नाहीत.