ठाणे: एकाच गावात राहत असल्याची संधी साधून दगाबाज मित्राने तिच्याशी मैत्री केली. याच मैत्रीमधून दगाबाजाने तरुणीसोबत मोबाईलमध्ये दोघांचे फोटो काढले होते. यानंतर तो हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन मैत्रिणीला ब्लॅकमेल करत पैसे मागायचा. या सततच्या छळाला कंटाळून मैत्रिणीने डोंबिवलीतील देसलेपाडा येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात दगाबाज मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय ऋषीपाल (वय ३३) असे दगाबाज आरोपीचे नाव आहे.
फोटोच्या माध्यमातून ब्लॅकमेल: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक तरुणी ही आपल्या कुटुंबासह हरयाणा राज्यातील असून ती डोंबिवली पूर्वेतील एका सोसायटीत राहत होती. आरोपी अजय आणि मृतक तरुणी हे हरियाणा मधील एकाच गावामधील रहिवासी आहेत. त्यांच्यामध्ये मैत्री झाली होती. या मैत्रीतून आरोपी मित्राने मृतक तरुणी सोबत मे, २०२३ महिन्यात मोबाईल मधून दोघांचे सोबत फोटो काढले होते. गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत दगाबाज अजयने त्या तरुणीसोबतच्या फोटोचा आधार घेऊन तिला ब्लॅकमेल करून त्रास देण्यास सुरुवात केली.
अखेर त्याने केले फोटो व्हायरल: तू मला पैसे दे. नाहीतर तुझ्या सोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करतो, अशी धमकी सतत मृतक मैत्रिणीला देत होता. शिवाय सोशल मीडियावर आपल्या मैत्रीचे फोटो प्रसारित झाले तर कुटुंबीयांसह समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी भीती मृतक तरुणीला वाटू लागली. त्यातच दगाबाज अजयने पैशाचा तगादा सुरूच ठेवला. त्यानंतर मृत मैत्रिणीकडून पैसे मिळत नसल्याचे पाहून त्याने अखेर ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. फोटो व्हायरल झाल्याने हा प्रकार तिच्या लक्षात येताच तिने गेल्या महिन्यात आपल्या राहत्या घराच्या परिसरात आत्महत्या केली.
अखेर गुन्हा दाखल: मानपाडा पोलीस ठाण्यात मृतक मैत्रिणीचे नातेवाईकानी तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी डोंबिवलीसह हरयाणा येथे जाऊन चौकशी केल्यानंतर हा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील करत आहेत.
हेही वाचा: