ठाणे - पंतप्रधान मोदींनी 'सबका साथ सबका विकास' हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून देशातील सर्व लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान मुद्रा योजना अमलात आणली. या योजने अंतर्गत विविध बँकेतून लघु उद्योजकांना दहा लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करण्याची सुविधा दिली. मात्र, याचा गैरफायदा घेत कल्याणातील एका महिलेने हजारो महिलांकडून आमिष दाखवून तीस हजार रुपयांची आगाऊ रक्कम घेतली. मात्र, गेल्या दोन वर्षांत मुद्रा लोन मंजूर न झाल्याचे पाहून फसवणूक झालेल्या महिलांनी कल्याण तहसीलदार कार्यालयाजवळ त्या महिलेला बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी, महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी तिला अटक केली आहे. शमीम बानो असे आरोपी महिलेचे नाव आहे. ती काँग्रेसची पदाधिकारी असल्याचे समोर आले आहे.
दोन वर्षापासून हजारो महिलांची फसवणूक -
गेल्या दोन वर्षांपासून हजारो महिलांना आरोपी शमीम ही महिला मुद्रा योजने अंतर्गत लोन देण्याचे आमिष दाखवून प्रत्येकी लाभार्थी महिलांकडून हजारो रुपये उकळले होते. मात्र, दोन वर्षे उलटूनही लोन मंजूर होत नसल्याने आपली फसवणूक केल्याचे महिलांचे लक्षात आले. यानंतर शेकडो महिलांनी फसवणूक करणाऱ्या महिलेच्या कार्यालयावर धडक दिली. तसेच तिला बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे आज शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांसह फसवणूक झालेल्या महिलांनी शमीम बानो हिला गाठून जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, उलट शमीम बानो हिने त्या महिलांना उलट उत्तर देऊन हमरीतुमरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या महिलांनी तिला हिला चांगलाच हिसका देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.
हेही वाचा - 74 वर्षीय रिक्षावाल्याची कहाणी व्हायरल, क्राऊड फंडिंगमधून मिळाली 24 लाखांची मदत
आरोपी शमीम बानोवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल -
आरोपी शमीम बानो हिच्यावर कल्याणमधील विविध पोलीस ठाण्यात फसवणूक, दरोडा, नागरिकांकडून धमकावून पैसे उकळणे, असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. तर गेल्या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्यावतीने नेतेवली परिसरातील प्रभागातून तिने निवडणूकही लढवली होती.