ठाणे - कल्याण-शिळ मार्गावर पुन्हा एकदा पाइपलाइन फुटल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले. पडले आणि खिडकाळी गावांच्या दरम्यान ही भलीमोठी जलवाहिनी अचानक फुटली. त्यामूळे कल्याण-शिळ मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. तर कल्याण-शिळफाटा येथून ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारी एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी रात्रीच्या सुमारास फुटली आणि संपूर्ण परिसर जलमय झाला. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली.
काही आठवड्यांपूर्वीच झाली अशी घटना -
विशेष म्हणजे काही आठवड्यांपूर्वीही अशाच प्रकारे पाइपलाइन फुटून संपूर्ण रस्त्यावर पाणी आले होते. यावेळीही लाखो लिटर पाणी रस्त्यावर आल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याचा परिणाम इथल्या वाहतुकीवर झाला. कल्याण-शिळ रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी मनसेचे ट्रॅफिक वॉर्डन मदत करत होते. तर रात्री उशिरा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
पाणी जपून वापराचे नागरिकांना आवाहन -
कल्याण-शीळ मार्गावरील खिडकाळी येथे मेन लाइनवर ब्रेकडाउन झाल्यामुळे पंपिग बंद करण्यात आले. त्यामुळे डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 1, फेज 2 आणि निवासी विभाग, तसेच सर्व ग्रामपंचायत भागांना दुसरीकडून पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची एमआयडीसीच्या पाणी विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे रहिवाशांनी पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले.
हेही वाचा - मध्यप्रदेशातून 'मेड इन जपान'च्या पिस्तुलांची विक्री; उल्हासनगरमध्ये तस्कर गजाआड
हेही वाचा - दुचाक्यांच्या हौसेपाई पोहचले कोडठीत; बनावट चावीने लंपास करायचे बाईक