ठाणे - कल्याणातील उर्दू शाळेची भिंत कोसळून भिंतीच्या लगत असलेल्या दोन घरांवर पडल्याने चार वर्षाच्या चिमुकल्यांसह तिघांचा मृत्यू झाला होता तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अनाधिकृत बांधकामामुळे त्या घरात पावसाचे पाणी भिंतीतून झिरपत असल्याचे सांगितल्यानंतरही दुर्लक्ष केले गेले. यामुळे सदर घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत बाजारपेठ पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. इकलाख मौलवी, अहमद मौलवी, सलमान मौलवी, सलीम मौलवी आणि जावेद मौलवी असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दुर्गाडी किल्ला समोर असलेल्या नॅशनल उर्दू शाळेची भिंत कोसळली. ही भिंत लगतच्या घरावर पडल्याने शोभा कांबळे या वृद्ध महिलेसह 3 वर्षाचा चिमुकला हुसेन सय्यद आणि त्याची आई करीम सय्यद यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर आरती कर्डिले ही तरूणी गंभीर जखमी झाली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करीत पुढील तपास सुरू करण्यात आला होता. यामध्ये पाचही आरोपी दोषी आढळल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, या पाचही आरोपींनी पालिकेकडून बांधकाम परवानगी न घेता येथील खोल भटाळे तलावात भरण टाकून अनाधिकृतपणे हे बांधकाम केले होते. या खोल्यांमध्ये राहणाऱ्या मृतक शोभा कांबळे, करीमा सय्यद यांच्याकडून 2 हजार रुपये मासिक भाडे घेण्यात येत होते. तसेच पावसाळ्यात या घराच्या भिंतीतुन पाणी झिरपत असल्याने घराची दुरुस्ती करण्याची मागणी केली गेली होती. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यामुळे घरांची भिंत अधिकच कमकुवत झाली. त्यामुळे घडलेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अधिक तपास बाजारपेठ पोलीस करीत आहे.