ठाणे: आगामी पालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. रविवारी मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या मतदारसंघातील रायलादेवी तलाव येथे उत्तर भारतीयांच्या छटपूजा (Chhath Puja) कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी शिंदे यांनी जबरदस्त भाषण करून वागळे इस्टेट (Wagle Estate) हा माझाच गड असल्याचे अधोरेखित केले.
पालिका निवडणूकीची तयारी: येत्या काही महिन्यात राज्यात पालिका निवडणूकीचे बिगुल वाजले जाणारं असून त्या निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून राज्यभर जोरदार तयारी केली जात आहे. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात दगाफटका होऊ नये म्हणून शिंदे गटाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आत्तापासूनच कामाला लागले आहेत. मतदारसंघातील प्रत्येक कार्यक्रमात शिंदे गट सक्रिय होताना दिसत आहे. ठाण्यात रविवारी छटपूजा कार्यक्रमाचे अनेक ठिकाणी आयोजन केले होते. रायलादेवी तलाव, कोलशेत घाट, उपवन तलाव याठिकाणी छटपुजेचे आयोजन करण्यात आले होते. रायलादेवी तलाव येथे छटपूजा सेवा समिती आयोजीत कार्यक्रमात शिंदे आपल्या ताफ्यासह उपस्थित झाले होते. या उत्सवात मी आवर्जून उपस्थित राहत असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
काय म्हणाले शिंदे? : भाषणादरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले, "ठाकरे गटाकडून आम्हाला आमच्याच बालेकिल्ल्यात घेरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र वागळे इस्टेट हा एकनाथ शिंदे याचा गड आहे. याच मतदारसंघातून आधी नगरसेवक, आमदार, आणि आता तुमच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झालो आहे. फक्त ४ महिन्यात आपण ग्रामपंचायतींमध्ये जोरदार विजय मिळवला आहे, त्यामूळे विरोधक चिंतेत आहेत. आमच्या या विजयांमुळे विरोधकांच्या झोपा उडाल्या असल्याची टीका शिंदे यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्री जाणार अयोध्येला: येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकाऱ्यांसह अयोध्येला जाणार आहेत. ठाण्यातील छठ पूजेच्या कार्यक्रमा मध्ये मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. बाळासाहेबांचं स्वप्न साकार होत असून त्यासाठी अयोध्येला रामाच्या दर्शनाला जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.