ठाणे - शहरासह ग्रामीण भागात निर्भयपणे मतदान करा, कोणत्याही अमिषाला बळी पडून आपले अमूल्य मत देऊ नका, मतदार राजा जागा हो आणि निर्भयपणे मतदानाचा हक्क बजाव, अशी जनजागृती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शहरात, 'बाटलीची मजा देईल पाच वर्षांची सजा' आणि 'अमिष थोड्या पैशांचे, त्रास ५ वर्षांचा', अशा आशयाचे मोठ-मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्यात ग्रामपंचायतींपासून ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उमेदवार विविध प्रकारची शक्कल लढवत असतात. यामध्ये काही उमेदवार पैशांचे वाटप करतात तर काही दारूच्या बाटल्यासह मटनाचे जेवण देऊन मतदान आपल्या पारड्यात पाडून घेण्याचा प्रयत्नात असतात. त्यामुळे समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या उमेदवारांचा पराजय होतो. मात्र, यावेळी निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीत जनजागृतीच्या माध्यमातून 'तुमचं मत, तुमची ताकद, अशी मतदारांना जाणीव करून देण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मतदार जागृत होऊन, मतदार योग्य उमेदवारांना मतदान करतात का? की प्रलोभनांना बळी पडतात ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.