ठाणे - पेट्रोल पंपावर सीएनजी भरण्यासाठी आलेल्या एका प्रवासी व्हॅनला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना भिवंडी-नाशिक जुन्या मार्गावरील चविंद्रा गावाच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपावर घडली आहे. मात्र, या घटनेमुळे पेट्रोल पंपसह परिसरात खळबळ उडाली व नागरिकांची जीवाच्या भीतीने पळापळ झाली होती. तर काही वेळातच व्हॅन जळून खाक झाली आहे.
भिवंडी तालुक्यातील चविंद्रा गावात हिंदुस्थान पेट्रोलियमच्या (एचपी) पंपावर वाहनांमध्ये सीएनजी भरण्याची व्यवस्था आहे. विशेष म्हणजे, हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. अशातच सोमवारी (दि. 30 नोव्हेंबर) दुपारच्या सुमाराला प्रवासी वाहतूक करणारी व्हॅन सीएनजी भरण्यासाठी आली. त्यावेळी व्हॅनमध्ये पंपावरील कर्मचाऱ्याने गॅस भरला आणि चालकाने व्हॅन पुढे घेण्यास सुरू करताच अचानक वाहनाने पेट घेतला. हे पाहून पेट्रोल पंपावर गोंधळ उडाला. पंपावरील कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी असलेल्या काही यंत्रणांचा वापर केला. दुसरीकडे भिवंडी अग्निशमन दलाच्या कार्यालयात घटनेची माहिती मिळताच काहीवेळातच अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल होऊन अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश मिळविले; त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. मात्र, तोपर्यंत व्हॅन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
सीएनजी टाकीचा प्रश्न ऐरणीवर
कुठल्याही वाहनात असलेल्या सीएनजीच्या टाकीची तपासणी करणे बंधनकारक असून ती अधिकृत दुकानातून द्यावी, असे शासनाचे नियम आहे. मात्र, भिवंडीसह इतर शहरात याचे पालन न करताच एखाद्या गॅरेजवाल्याकडून सीएनजीची टाकी वाहनात बसविण्यात येत असल्याने अशा आगीच्या दुर्घटना घडत असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.
हेही वाचा - पोलिसांऐवजी 'तिने'च केला तपास, आरोपी दीड वर्षांनंतर गजाआड
हेही वाचा - धक्कादायक..! मांत्रिकाच्या सांगण्यावरून विवाहितेला बेदम मारहाण करीत घरातून काढले