ठाणे - उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार कुमार आयलानी यांच्या मर्सिडीज कारवर अज्ञात हल्लेखोरांकडून दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. कारवरील हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु केला आहे.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे खळबळ
उल्हासनगर विधानसभेचे भाजपाचे आमदार कुमार आयलानी यांचा मुलगा धीरज आयलानी हा शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास मर्सिडीज (क्र. MH-O5-DH-5555) ही आलिशान कार कार घेऊन उल्हासनगर महापालिकेच्या मागील बाजूस आंबे स्पोर्ट क्लबजवळ उभा होता. त्यावेळी अचानक एका तरुणाने दगडाने गाडीवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली. तर सुदैवाने या हल्ल्यात आमदाराचा मुलगा धीरज आयलानी हा थोडक्यात बचावला. परंतु मर्सिडीज कारचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करीत गुन्हा दाखल केला आहे.