ठाणे: ठाणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात बळीप्रतिपदेला भाताची मळणी झाल्यावर भाताच्या पेंड्याला गावातल्या चावडीवर असलेल्या मुख्य रस्त्यावर पेटवण्यात येते. हा पेंडा पेटवल्यानंतर त्यातून निघणाऱ्या धुरातून व आगीच्या ज्वालांमधून गावात असणारी सगळी गुरे- ढोरे एका बाजूकडून, दुसरीकडे पेटत्या आगीतून उडवत नेली जातात. विशेष म्हणजे पूर्वापार परंपरेनुसार चालत आलेली ही प्रथा आजही ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गावोगावी त्याच उत्साहात शेतकरी दिवाळी साजरी करताना दिसत आहे.
बळी प्रतिपदेच्या दिवशी गुरांना सजविण्याची परंपरा: बळी प्रतिपदेच्या दिवशी पहाटे लवकर उठून किंवा आदल्या दिवशीच आम्हा शेतकऱ्यांच्या घरोघरी असलेल्या बैलांची स्वच्छ आंघोळ घातली जाते. त्यांच्या शिंगांना तासून रंग किंवा तेल लावून चमकावले जाते. बैलांच्या शिंगांना फुगे बांधून, त्यांच्या अंगावर गेरू आणि पांढऱ्या रंगाचे हाताच्या पंजाने ठसे उमटवले जातात. त्यांच्या अंगावर झालर वगैरे टाकून छानपैकी सजवले जाते. बैलांच्या गळ्यात घुंगरू बांधून हार घालून त्यांच्यावर गुलाल उधळला जातो. यंदाच्या दिवाळीत कोरोनाचे संकट आल्याने त्या पेटत्या आगीची पूजा करून देशावरील कोरोनाचा संकट लवकर टळू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे, ईडा पिडा टळो बळीचे राज्य येवो, प्रार्थना करण्यात आली. महत्वाचे म्हणजे जिल्ह्यतील आगरी, कोळी, कुणबी शेतकरी गुरांना पूज्यनीय मानून गुरांच्या सोबतीने तो स्वत: शेतात राबतो. शेतकऱ्यांची बहूतांश कामे दिवाळीत आटोपतात. कृतज्ञता म्हणून दिवाळीत गुरांचा खास सण साजरा करतात.
शेतकऱ्यांची हायटेक शिक्षण घेणारे मुलंही या प्रथेत: शेतकऱ्यांची हायटेक शिक्षण घेणारे मुलांच्या मते बऱ्याच वेळा गुरांच्या अंगाला पिसवा, गोचिड (गो-गाय, चिड- किड) चिटकलेल्या असतात. त्यामुळे पेंढ्याची आग करून त्यावरून गुरांना उडवतात. ही आग पेंढ्याची असल्याने सौम्य असते. लाकडा सारखे निखारे या आगीत नसतात. या शेकोटीवरून गुरांना उडवल्यावर त्यांच्या अंगावरील जंतू धुरामुळे गळून पडतात, नष्ट होतात. आगीचे भय गुरांना रहात नाही. पुढे कधी यदा कदाचित रानात वणवा पेटल्यास गुरे सैरभैर होत नाहीत. शिवाय सोबत गावातील जाणकार माणसे मदतीला सतर्क असतातच. तर हिवाळ्याच्या दिवसात आगीवरून गुरे उडवून त्यांना उबदार शेक मिळवून देण्याची पारंपारीक पध्दत शास्त्रीय दृष्ट्या योग्यच आहे. तथाकथीत प्राणी मित्रांनी काळजी करण्यासारखे काहीच कारण नसल्याचे सांगत या प्रथेचे सर्मथन केले आहे.