नवी मुंबई - कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने उरणमध्ये प्रवेश केला आहे. मात्र उरणमध्ये शासनाचे अत्याधुनिक व सुसज्ज असे एकही शासकीय हॉस्पिटल नसल्याने उरण नागरिकांना मुंबई, नवी मुंबईमध्ये जाऊन योग्य ते उपचार करून घ्यावे लागतात. हा प्रकार वर्षानुवर्षे सुरूच आहे. उरणमध्ये कायम स्वरूपी सुसज्ज व अत्याधुनिक हॉस्पिटल असावे, अशी मागणी उरण सामाजिक संस्थेने शासनाकडे अनेक वेळा केली आहे. शासन दरबारी याचा अनेक वेळा पाठपुरावा केला, मात्र शासनाने या समस्याकडे दूर्लक्षच केले. त्यामुळे उरणच्या नागरिकांमध्ये शासनाच्या या उदासीन धोरणाबाबत खूपच नाराजी पसरली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या महत्त्वाच्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जेएनपीटीच्या वर्धापन दिनीच म्हणजेच दि. 26 मे रोजी उरण सामाजिक संस्थेने केलेल्या आवाहनानुसार उरणमधील नागरिकांनी आपल्या घरातच बसून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत पोलीस प्रशासनाला सहकार्य करीत एक दिवसाचे अनोखे घर बैठे आंदोलन केले आहे.
उरण तालुक्यात जेएनपीटी हे आंतरराष्ट्रीय बंदर आहे. येथी सीएसआर फंडचे कोट्यवधी रुपये इतर जिल्ह्यातील कामासाठी वापरले जातात, असा उरणच्या नागरिकांनी आरोप केला आहे. मात्र तोच फंड उरण तालुक्यातील सुसज्ज हॉस्पिटल बांधण्यासाठी वापरल्यास उरणमध्ये त्वरित सुसज्ज व अत्याधुनिक हॉस्पिटल उभे राहिल. मात्र याकडेही जेएनपीटी प्रशासन दुर्लक्ष करत आहे. उरण तालुक्यात जेएनपीटी बंदराकडे देशाच्या वेगवेगळ्या राज्यातून दररोज हजारो कंटेनर येतात. या कंटेनरच्या चालक, वाहक यांच्यापासून कोरोनाचा प्रसार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उरण पनवेलच्या वेशीवरच त्यांची कोरोनाची तपासणी करावी.
तसेच जे. एन. पी. टी., ओएनजीसी, बीपीसीएल, सीएफएस गोडावून आदी कंपन्यांनी त्यांचा अखत्यारित असलेला सीएसआर फंडाचा उपयोग करून उरण तालुक्यात अद्यायावत करोना केअर सेंटर आणि विलगीकरण कक्ष उभारावे. या सर्व कंपन्यांनी उरण तालुक्यातील रुग्णालयांना अॅम्ब्युलन्स, पीपीई कीट, व्हेंटिलेटर, मास्क इत्यादि करोना संबंधित साहित्य मोफत त्वरित पुरवावेत, या मागणीसह उरण तालुक्यात कायम स्वरूपी सुसज्ज व अत्याधुनिक असे हॉस्पिटल उभारण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी दिली. सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील यांनी उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला उरणमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या घर बैठे आंदोलनामुळे शासनाला आता तरी जाग येईल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.