ठाणे - अज्ञात समाजकंटकाने आज पहाटेच्या सुमारास एका इमारतीखाली पार्किंगमध्ये उभ्या करून ठेवलेल्या तीन दुचाकी जाळण्याचा प्रयत्न केला.
ही घटना भिवंडी ठाणे रस्त्यावरील खाडी लगतचे कशेळी गावात घडली असून इमारतीमधील नागरिकांना वेळीच जाग आल्याने आग विझविण्यात आल्याने मोठी वित्तहानी टळली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात जाळपोळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी तालुक्यातील कशेळी ग्रामपंचायत क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाशेजारी अष्टविनायक एनकलेव्ह ही इमारत असून इमारतीसमोरील मोकळ्या जागेत तेथील रहिवाशांनी दुचाकी उभ्या करून ठेवल्या होत्या. आज पहाटे चार वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने दुचाकींना आग लावली. या आगीत तीन दुचाकी जळून खाक झाल्या असून सुदैवाने आगीच्या ज्वालांनी इमारतीमधील नागरिकांना जाग आल्याने त्यांनी लागलीच आग विझविल्याने पुढील अनर्थ टळून मोठी वित्तहानी टळली.
याप्रकरणी नारपोली पोलीस दाखल गुन्ह्यात आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच भिवंडी लगत असलेल्या मीठ पाडा परिसरातही एका दुचाकीला अज्ञात समाजकंटकाने आग लावून पळ काढल्याचा गुन्हा भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात दाखल आहे. यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे दुचाकी जळीतकांड पुन्हा सुरू होते कि काय? अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.