ठाणे : गृहमंत्री फडणवीस यांचे व पंतप्रधान मोदींचे नाव घेऊन मृतक भावाला न्याय देण्यासाठी बोट छाटून घेतल्याने हे प्रकरण देशभर गाजत आहे. याप्रकरणातील पीडित धनंजय ननावरे यांनी छाटलेले बोट घेऊन संबधित पोलीस ठाण्यात गेले असता, कर्त्यव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांची विचारपूस न करताच त्यांना पोलीस ठाण्यातून जाण्यास सांगितल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यामुळे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी एक पोलीस अधिकाऱ्यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत, तिघांचे तडकाफडकी निलंबन केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण : दिवंगत माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरे यांनी १ ऑगस्टला पत्नी उज्वलासह, उल्हासनगर ४ नंबर परिसरात गच्चीवरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी बडे यांनी फिर्याद देत, सुरूवातीला मुख्य आरोपी संग्राम निकाळजेसह त्याच्या पाच अनोळखी साथीदारांना आरोपी केले. त्यानंतर आत्महत्या करण्यापूर्वी ननावरे यांनी आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात राहणाऱ्या संग्राम निकाळजे, भाजपचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर, वकील ज्ञानेश्वर देशमुख आणि नितीन देशमुख या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते.
पोलीस तपासाला वेग देत नाही : पोलिसांनी घटनेच्या दिवशी नंदकुमार ननावरे यांच्या मृतदेहाची तपासणी केली असता, त्यांच्या खिश्यात एक चिट्ठीही मिळाली होती. या चिठ्ठीत राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा ओमी टीम कलानीचा खासम खास कमलेश निकम, शिंदे गटाचे आमदार किणीकर यांचा स्वीय सहाय्यक शशिकांत साठे, राष्ट्रवादीचा नेते नरेश गायकवाड, गणपती कांबळे यांची ही नावे आढळून आली होती. त्यानंतर व्हिडिओ आणि चिठ्ठीच्या आधारे आठ जणांविरोधात गुन्हा दाखल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. ननावरे दाम्पत्याच्या आत्महत्येला अठरा दिवस झाल्यानंतरही पोलीस तपासाला वेग देत नाही. उलट गुन्हे शाखा प्रकरणाच्या तपास गुंडाळण्याचा मागे लागल असल्याचा आरोप करत, मृतकचे भाऊ धनंजय ननावरे यांनी त्यांच्या उजव्या हाताचे एक बोट छाटून ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवत प्रत्येक आठवड्याला शरीराच्या एक एक अवयव छाटून पाठवणार असल्याचा इशारा, धनंजय यांनी व्हायरल व्हिडिओ करून दिला होता.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल : पोलीस आरोपीना सरंक्षण देत असल्याची खंत नंदकुमार ननावरे यांचा भाऊ धनंजय ननावरे यांनी व्यक्त करत सातारा जिल्ह्यातील फलटण येथील राहत्या घरा समोर उजव्या हातचे एक बोट छाटून घेतले. त्यानंतर ते बोट घेऊन फलटण शहर पोलीस ठाण्यात घेऊन जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या व्हिडिओमध्ये पोलीस ठाण्यात दिसून येते की, एका महिला कर्मचारी पोलिस ठाण्याच्या एका टेबलवर कापलेले बोट ठेवून बाहेर जा अशी आरडाओरड करत होती. तसेच इतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी धनंजय ननावरे यांची विचारपूस न करताच त्यांना पोलीस ठणयातून जाऊ दिले. त्यानंतर काही वेळातच हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडिओचे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी विश्लेषण केल्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्यांसह दोन कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना निलंबित केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
मंत्र्यांच्या पीएचे नाव असल्याची शक्यता : कमलेश निकम, शशिकांत साठे, नरेश गायकवाड, गणपती कांबळे असे पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीची नावे आहे. तर या घटनेतील मुख्य आरोपी संग्राम निकाळजेसह रणजितसिंह नाईक निंबाळकर, वकील ज्ञानेश्वर देशमुख, वकील नितीन देशमुख यांना या आदीच अटक पूर्व जामीन २८ ऑगस्टपर्यत असल्याने तूर्तास त्यांना अटक केली नसल्याची माहिती, खंडणी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास बोडके यांनी दिली. या प्रकरणात एका मंत्र्यांच्या पीएचे नाव असल्याची शक्यता निर्माण झाल्याने ठाणे खंडणी पोलीस पथक त्या दिशेने तपास करीत असल्याचे सांगण्यात आले.
आरोपीना पुन्हा चार दिवसाची पोलीस कोठडी : चार अटक आरोपींची कोठडी २४ ऑगस्ट रोजी संपल्याने त्यांना पुन्हा कोर्टात हजर केले असता, २८ ऑगस्ट पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे आरोपी यापूर्वी पाच दिवस पोलीस कोठडीत असताना पोलिसांच्या तपासात सहकार्य करत नसल्याने, शिवाय अटक चारही आरोपीचे मोबाईल पोलिसांनी जप्त करून ते सायबर आणि फॉरेन्सी लॉबकडे तपासणीसाठी पाठवले. त्याचा अहवाल अजुनपर्यत आला नसल्याचा युक्तिवाद फिर्यादीचे वकील वसीम शेख यांनी न्यायालयात केल्याने, त्यांचा युक्तिवाद मान्य करत चारही आरोपीना पुन्हा चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती फिर्यादी यांचे वकील वशीम शेख यांनी दिली आहे.
छोटा राजन आपला नातेवाईक : फिर्यादी धनंजय ननावरे यांच्याशी संपर्क साधला असता, गुन्ह्यातील मुख्य आरोपी संग्राम निकाळजे हा कुख्यात छोटा राजन गँगचा प्रमुख (राजेंद्र निकाळजे) सारखे असलेले त्याचे आडनाव असल्याने त्याने अनेकदा गावातील लोकांना धमकावण्यासाठी छोटा राजन आपला नातेवाईक असल्याचे भासवून गावकऱ्यांमध्ये आपला दरारा निर्माण करत होता. मात्र त्याने सारख्या नावांचा फायदा घेऊन अनेकांना धमकावले होते, पण आम्ही त्याला लहानपणापासून पाहत आलो आहोत, त्याची परिस्थिती काय हे आम्हाला सर्व माहीत आहे. छोटा राजनचे नाव घेऊन त्याने अनेकांना त्रास दिल्याने त्याला लवकर अटक झाली पाहिजे. असेही धनंजय ननावरे यांनी सांगितले.
हेही वाचा -