ठाणे : दोन मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी एकाचे नाव अब्दुल्ला संजय ईराणी उर्फ सय्यद, (वय २२, रा. ईराणी वस्ती, कल्याण) असे आहे. तर दुसऱ्या गुन्हेगाराला कल्याण पोलिसांनी भिवंडी तालुक्यातील सोरगांव येथे सापळा रचून अटक केली आहे. त्याच्यावर ८० गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. सौरभ उर्फ सोन्या मनोज साळुंके असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस तपासात ही माहिती समोर आल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त, दत्तात्रय शिंदे यांनी दिली आहे.
गुरुव्दारा कोठे आहे विचारत चोरी : तक्रारदार संजय अशोक नैनवाणी, (वय ४६) हे १४ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून अंबरनाथहून उल्हासनगर येत होते. त्याच सुमारास गुन्हेगार अब्दुला याने साथीदारासह त्याचा पाठलाग केला. 'गुरुव्दारा कुठे आहे' असे विचारले असता, त्यांनी उजव्या बाजूने जाण्यास सांगीतले. त्यानंतर थोड्या अंतरावर पुढे गेले असता दुचाकीवरील गुन्हेगाराने त्यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन खेचून त्यांना पोलीस कम्प्लैंट किया तो छोडेंगे नही अशी धमकी देवून पळून गेले. त्यानंतर तक्रारदार यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात गुन्हेगारावर गुन्हा दाखल केला.
अब्दुल्ला संजय ईराणीवर ८० गुन्हे : तपासादरम्यान पोलीस पथकाला अब्दुल्ला संजय ईराणी उर्फ सय्यद, हा परभणी शहरातील रहीमनगर येथे असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे १७ जानेवारी रोजी रहीमनगरमधून अटक केली. त्यानंतर उल्हासनगर न्यायालयात हजर केले असता २४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खळबळजनक बाब म्हणजे या गुन्हेगारावर एकूण ८० जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये चैन / मोबाईल चोरी, वाहन चोरी, खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. शिवाय मुंबई पोलीस आयुक्तालय, ठाणे ग्रामीण परिसर, कर्नाटक राज्यात वरिलप्रमाणे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. गुन्हेगार अब्दुल्ला संजय ईराणी उर्फ सय्यद हा विविध पोलीस ठाण्यातील दाखल एकूण ४ मोक्का गुन्हयात फरार होता.
चाकूचा धाक दाखवून दागिन्यांची चोरी : १० जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास कल्याण पश्चिम भागातील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अनोळखी गुन्हेगारांनी नागरिक आणि ४ महिलांना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने चोरी केले होते. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयांचा तपास सुरु असताना सराईत गुन्हेगार सोन्या साळुंखे याने त्याच्या साथीदारासोबत चोरी केल्याचे समोर आले आहे. कल्याण तालुक्यातील खडवली भागात सापळा रचुन कारवाई करण्यात आली. मात्र गुन्हेगार तपास पथकांला सलग चार दिवस रात्रंदिवस गुंगारा दिला गेला.त्यानंतर पथकाने वॉच ठेवत त्याला अटक केली. आरोपी सोन्या साळुंखे हा त्याच्या घरी मौजे सोरगांव, भिवंडी येथे असताना कारावाई करण्यात आली. त्यानंतर १७ जानेवारी रोजी सापळा रचून गुन्हेगार सौरभ उर्फ सोन्या मनोज साळुंके यास अटक केली आहे. त्याला २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.