ठाणे - नातेवाईकाच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी निघालेल्या कुटुंबावर संकट कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील आसनगावजवळ घडली आहे. या घटनेत कुटुंबातील २ जण ठार झाले, तर ६ गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातामध्ये चारचाकीचा चुराडा झाला आहे.
नाशिक येथील भवर कुटुंबीय आज नाशिकहून ठाणे येथे एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी चारचाकीतून निघाले होते. आज (सोमवार) संध्याकाळी मुंबई-नाशिक महामार्गावरील आसनगाव नजीकच्या हॉटेल डायमंडजवळ भरधाव चारचाकीचा पाठीमागील टायर फुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यामुळे चारचाकी समोरच्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात दोन जण ठार, तर सहा जण जखमी झाले. मुंबई-नाशिक महामार्गावरून ठाणे येथे जात असताना आसनगावजवळ संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला. प्रकाश भवर (वय 55 वर्षे) व सुमन टोचे (वय 60 वर्षे) हे ठार झाले असून राजेंद्र भवर, आनंद भवर, संगीता भवर, बाळासाहेब भवर, रामदास टोचे व अरुण भवर हे ६ जण जखमी झाले आहेत.
जखमींवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचे शहापूर पोलिसांनी सांगितले. याबाबत शहापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावर अपघातांचा आकडा दिवसेंदिस वाढत चालला आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या सुप्रसिद्ध गायिका गिता माळी यांचा अपघात झाला होता.
हेही वाचा - उल्हासनगरमधून 5 वर्षीय चिमुरडीचे अपहरण, आरोपी 12 तासात पोलिसांच्या ताब्यात