नागपूर - शहरातील गजानन नगरमध्ये अवैधरित्या शस्त्राची तस्करी करणाऱ्या टोळीकडून १० धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहे. गुन्हे शाखा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. प्रतिक फुलझेले नावाच्या व्यक्तीच्या घरात ही शस्त्रे लपवून ठेवण्यात आली होती.
शहरातील वाढते गुन्हे लक्षात घेता गुन्हे शाखा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहात असलेल्या रजत शर्मा नावाच्या आरोपीच्या सांगण्यावरून आरोपी प्रतिक फुलझेलेने त्याच्या घरी ही शस्त्रे ठेवली होती. पोलीस विभागातील गुप्तहेरांनी दिलेल्या माहीतीनुसार, पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात सापळा रचत गजानन नगर परिसरातील त्याच्या घरावर छापा टाकून ही कारवाई केली आहे. या कारवाईत चाकू, तलवारीसह इतरही धारदार शस्त्र मिळून 10 शस्त्रे जप्त करण्यात आली आहे. तर ज्याच्याकडे छापा टाकण्य़ात आला त्याला अटक करण्यात आली. तर दुसऱ्या साथीदारालाही पोलिसांनी जेरबंद केले आहे.
मात्र, हा शस्त्रसाठा प्रतिकने आपल्या घरी का ठेवले, यामागे त्याचा काय उद्देश होता. या संदर्भात आता पुढील तपास करण्यात येत आहे. दरम्यान शहरातील गुन्ह्यांची वाढती संख्या पाहता अवैध शस्त्र बाळगण्याचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे अशा गुन्हेगारांवर वेळीच कारवाई होणे अपेक्षित आहे. शहरात अशा अवैध शस्त्रसाठा कुठून येतोय याचा शोध पोलिस घेत असून तस्करी करणाऱ्यांच्या वेळेवर मुसक्या आवळ्याचे काम सध्या नागपूर पोलिसांकडून करण्यात येत आहे.