ठाणे - पाईपलाइनच्या व्हॉल्व्हला गाडीचा धक्का लागून तुटल्यामुळे ५० वर्षीय चालकास जीवघेणी मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना बदलापूर - कटाई पाईपलाइन रोडवरील कोळेगाव नाक्यावर घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सत्यवान म्हात्रे असे अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. तर किसन रामा तोगरे (वय, ५० वर्ष ) असे गंभीर जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे.
मारहाणीत पोटातील आतडी निकामी
कल्याण-शिळ रोडला असलेल्या देसाई गावातील प्रभा भोईर चाळीत किसन रामा तोगरे हे राहतात. किसन हे एका वीट भट्टीवरील ट्रकवर चालक म्हणून नोकरी करतात. सोमवारी २ ऑगष्ट रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बदलापूर पाईपलाइन रोडला असलेल्या कोळेगाव नाक्यावर त्यांना अनोळखी व्यक्तीने शिवीगाळ करत मारहाण केली. या मारहाणीमुळे पोटातील Spleen अर्थात प्लिहा हा अवयव निकामी होऊन अंतर्गत रक्तस्राव तर झाला. शिवाय पोटातील आतडीही निकामी झाल्याचे जखमी किसन यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. जखमी ट्रक चालक किसन यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारातून बरे झालेले जखमी किसन यांनी हल्लेखोराने वर्णन पोलिसांना सांगितले आहे. या मारहाणीमुळे त्यांच्या जीवितास धोकाही उत्पन्न झाला. वेळीच उपचार सुरू केल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे.
घटना घडल्यानंतर १२ दिवसांनी गुन्हा दाखल
याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी घटना घडल्यानंतर १२ दिवसांनी अनोळखी हल्लेखोराच्या विरोधात विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोराला हुडकून काढण्यात पोलीस बाळू वंजारे आणि त्यांच्या पथकाने अवघ्या काही तासांतच सत्यवान म्हात्रे नामक संशयित हल्लेखोराला तो राहत असलेल्या कोळेगावातून ताब्यात घेतले आहे.
हल्लेखोराची रवानगी पोलीस कोठडीत
या संदर्भात पोलीस अधिकारी बाळू वंजारे यांनी सांगितले, की ट्रक चालक किसन तोगर हे सोमवारी २ ऑगष्ट रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कोळेगाव नाक्यावर थांबले होते. तेथून जाणाऱ्या पाईपलाइनच्या व्हॉल्व्ह त्यांच्या गाडीचा धक्का लागल्याने पाण्याच्या पाईपलाइनचा व्हॉल्व्ह तुटून नादुरुस्त झाल्याचे पाहून सत्यवान म्हात्रे याने किसन यांना बेदम मारहाण केली. वैद्यकीय तपासणी अहवालानुसार गुन्हा दाखल केल्यानंतर सत्यवान म्हात्रे याला ताब्यात घेतले असून त्याला रविवारी सुट्टीच्या विशेष न्यायालयात हजर केले आहे. दरम्यान त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे अधिकारी वंजारे यांनी सांगितले.
हेही वाचा - मित्राचा खून करत मृतदेहाला कूपनलिकेत; सांगलीतील धक्कादायक घटना