ठाणे - मध्य रेल्वे मार्गावर सर्वाधिक गर्दीचे असलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटालगत ट्रक उलथल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र ट्रकचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले.
वाढत्या गर्दीमुळे मध्यरेल्वेच्या मार्गाचे विस्तारीकरण सुरू असून याच पार्श्वभूमीवर डोंबिवली रेल्वे स्थानकाचे झपाट्याने फलाट तसेच नवीन पादचारी पुलाचे काम सुरू आहे. याच कामासाठी दिवसागणिक वाळू, खडी, सिमेंट, आदी बांधकाम साहित्य घेऊन येणाऱ्या सुमारे ५० ते ६० ट्रकची आवाजावी सुरू असते. असाच एक ट्रक खडी भरून रेल्वे स्थानकाच्या १ क्रमांक फलाटालगतच आज दुपारी दीड वाजल्याच्या सुमारास जात होता.
हेही वाचा - ठाण्यात मुसळधार पावसामुळे झाडे उन्मळून पडल्याने चारजण जखमी
त्याच दरम्यान फलाटालगतच्या भुसभुशीत जागा असलेल्या ठिकाणी अचानक खड्डा पडून त्यामध्ये ट्रक अडकला आणि तिरपा झाला. ट्रक पलटी होताना मोठा आवाज झाल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, पलटी झालेला खडीने भरलेला ट्रक क्रेनच्या मदतीने खड्ड्यातून काढणार असल्याची माहिती चालक भीमराव वानखडे यांनी दिली.