ठाणे - ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रस्तावित दिघा रेल्वे स्थानकांजवळील संजय गांधी नगर या परिसराच्या ठिकाणी ओवरहेड वायर तुटलयाने ट्रान्स हार्बर वाहतूक ठप्प झाली होती. आज (शुक्रवारी) दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे ठाणे वाशीकडे जाणारी वाहतूक बंद पडल्याने चाकरमान्यांनी रेल्वेमधून उतरत रेल्वे पटरीवरुन प्रवास करत ठाणे बेलापूर मार्ग गाठला.
हेही वाचा- 'प्लास्टिक द्या अन् डस्टबिन घेऊन जा' - पालिकेचा सामाजिक संस्थांसोबतचा उपक्रम
येथील प्रवाशांनी एनएनएमटी, एस.टी तसेच रिक्षांने प्रवास करत ठाणे स्टेशन गाठले. त्यातच पावसाने हजेरी लावल्यामुळे प्रवांशाना तारेवरची कसरत करत ठाणे बेलापूर मार्ग गाठावा लागाला. यावेळी रिक्षाचालकांकडून देखील अव्वाच्या-सव्वा भाडे आकरण्यात येत होते. यामुळे प्रवाशांनी देखील नाराजी व्यक्त केली. तर ट्रान्स हार्बर ठप्प झाल्यामुळे प्रवाशी देखील रेल्वे स्थानकांत अडकून पडले होते. जवळपास सव्वा तासाने ही वाहतूक सुरू झाली. मग प्रवाशांना धीर आला. दुपारी झालेल्या या प्रकारामुळे या अपघाताचा फटका कमी प्रमाणात बसला. मात्र, ऐन गर्दीच्या वेळेस हा प्रकार झाला असता तर लाखो प्रवाशांना याचा फटका बसला असता.