ठाणे - दिवाळीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. खरेदीसाठी ग्राहक देखील गर्दी करत आहेत. मात्र ग्राहकांसोबतच चोरटे देखील सक्रीय झाले आहेत. जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या उल्हासनगर शहरातील विविध मार्केटमध्ये या चोरांनी धुमाकूळ घातला आहे. एका महिलेच्या सतर्कतेमुळे चोरट्या महिलांचे त्रिकुट गजाआड करण्यात उल्हासनगर पोलिसांना यश आले आहे. सोनी काळे, सपना पवार आणि मनीषा काळे अशी या आरोपींची नावे आहेत.
'अशी' उघड झाली चोरी
उल्हासनगरमध्ये नेहरू चौक परिसरात गजानन मार्केट आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी नागरिक या ठिकाणी गर्दी करतात. शहरासह ग्रामीण भागातील नागरिक देखील या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात. याचाच फायदा या महिला चोरट्यांनी घेतला. त्यांनी अनेकांचे मोबाईल, तसेच रोख रकमेवर डल्ला मारला. मात्र एका दुकानात आपला मोबाईल चोरीला गेल्याचे एका महिलेच्या लक्षात आले. तिने लगेच या दुकानात संशयास्पदरित्या फिरत असलेल्या महिलांना पकडून त्यांची झडती घेतली. या झडतीत त्यांच्याकडे मोबाईल आणि पर्स आढळून आली. या महिलांना उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
विशेष म्हणजे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील हा चोरीचा प्रकार कैद झाला आहे. या चोरट्या महिलांकडून पोलिसांनी चार मोबाईल आणि रोख रक्कम असलेली पर्स जप्त केली. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
हेही वाचा - कोरोना योद्धा डॉक्टरचा सन्मान न करता सोसायटीतील रहिवाशांकडून मुलासह मारहाण
हेही वाचा - तरुणाचा मृतदेह वाघबीळ रेतीबंदर खाडीत आढळला, तीन दिवसांपूर्वी झाला होता बेपत्ता