ठाणे - भातसा- साजीवली घाट रस्त्यावर दुचाकीच्या अपघातात तिघे जण जागीच ठार झाले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. हे तिघे जण एकाच दुचाकीवरून ६ महिन्यांच्या बाळासह जात होते. मृतांमध्ये पती-पत्नी व मेहुण्याचा समावेश आहे. यामध्ये सहा महिन्याचे बाळ बचावले आहे.
शहापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले. राजू मांगे, (वय 22, रा. विंचूपाडा) जिजाबाई वाख, (वय 20, रा.मुरबीपाडा), सोमनाथ वाख (वय 25, रा. मुरबीपाडा) अशी मृतांची नावे असून आहे. मुरबीपाडा येथे राहणारे दोघे पती पत्नी आहेत. तर राजू मांगे हा त्यांचा मेहुणा आहे.
शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या परिसरातील भातसा-साजीवली घाटातील रस्त्याच्या उतारावरून एका दुचाकीवरून मृत पती-पत्नी व मेहुणा असे तिघे जण ६ महिन्यांच्या बाळासह आज सकाळच्या सुमाराला जात होते. उतारावरुन उतरत असताना चालकाचे भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात जाऊन आदळली. या भीषण अपघातात मृत राजू मांगे, सोमनाथ वाख आणि त्यांची पत्नी जिजाबाई वाख या तिघांचे मृतदेह दुसरीकडे उडाले होते. सुदैवाने त्यांच्यासोबत असलेले ६ महिन्याचे बाळ बचावले आहे. या अपघाताचा अधिक तपास शहापूर पोलीस करीत आहेत.