ठाणे - महानगरपालिकेचे धडाकेबाज सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
मुंब्रा येथे अनधिकृत बांधकामांचे पेव फुटल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे. त्यातच आता रमजानचा महिना सुरू असल्याने या अनधिकृत बांधकामांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळेच ठाणे महानगरपालिकेच्या वतीने एक मोठी कारवाई हाती घेण्यात आली. सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या या कारवाईला अनेकांनी विरोध केला.
दरम्यान, सोमवारी (ता. २७) त्यांना एक निनावी फोन आला. फोन करणाऱ्याने 'सदरची तोडकं कारवाई त्वरित बंद कर, नाहीतर तुला जीवे मारू', अशी थेट धमकी दिली. या धमकीने घाबरून न जाता आहेर यांनी त्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध नौपाडा पोलिसात तक्रार नोंदविली आहे. याआधी देखील त्यांच्या एका कर्मचाऱ्यावर चाकूने वार करण्यात आले होते. त्यामुळेच या धमकीला पोकळ धमकी न समजता नौपाडा पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.