ठाणे : ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. येथे अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे पालिका प्रशासनाने शहरातील डोंगर उतारावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. इर्शालवाडी येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिकेने आता पाऊले उचलले असून शहरात कोणतीही परिस्थिती उदभवू नये यासाठी डोंगर उतारावर राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे.
डोंगर उतार भागातील रहिवासीयांना स्थलांतरीत होण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. तरिही रहिवासी घर सोडत नसल्यामुळे शेवटी सील लावले जात आहे. पालिकेच्या प्रभाग समिती हद्दीतील डोंगर उतार, नाल्यालगत्त अनधिकृत बांधकाम करुन अनेक जण वास्तव्य करित आहेत. सद्यस्थितीत सुरु असलेल्या सततच्या पावसाळयात व भविष्यात होणाऱ्या अतिवृष्टीचा विचार करता डोंगर उतारावर व नाल्यालगतची माती मोठया प्रमाणावर वाहुन गेलेली आहे.
त्यामुळे सदरचा भाग भूसभूशित होऊन मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होत आहे. त्यावरील झोपड्या बांधकामे, स्ट्रक्चर्स खचून जिवित व वित्त हानी होण्याची शक्यता पालिकेने वर्तवली आहे. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार होवू नये या कारणास्तव डोंगरमाथ्याच्या पायथ्या लगत वास्तव्य करणाच्या नागरिकांनी राहत असलेल्या जागेचा वापर आपण तात्काळ बंद करुन इतरत्र स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्वत:हून स्थलांतर न केल्यास आणि काही जिवित व वित्त हानी झाल्यास ठाणे महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. याबाबतची जबाबदारी स्थानिक नागरिकांची असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान वागळे, माजिवडा, कळवा, मुंब्रा, लोकमान्य-सावरकरनगर परिसरातील तीव्र डोंगरउतार असून या भागात झोपड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
यापैकी कळवा ५००, मुंब्रा २२५, वागळे ६१ आणि घोडबंदर येथील माजिवडा २६ घरांना नोटीसा बजावण्यात आल्या असून काही नागरिकांचे स्थलांतरही पालिकेने केले आहे. पालिका प्रशासनाने मुब्रा येथील कैलास नगर डोंगराळ भागात ४०० ते ५०० नागरिकांचे तात्काळ स्थलांतर केले आहे. अनेकांना परिसरातील मशिदीत तर काही जणांना नातेवाईकांकडे पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा