ठाणे - जगात झपाट्याने पसरत असलेल्या कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आता सगळ्याच राज्याकडून विमानतळे देखील बंद करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याचा फटका हजारो यात्रेकरूंना बसत आहे. भारतात देखील याचे अनुकरण करत आपल्या केंद्र सरकारने काही तुरळक विमान उड्डाणे वगळता सर्व विमानसेवा रद्द केल्या आहेत. पण, यामुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांचा मात्र कोणीही वाली राहिलेला नसल्याचे चित्र दिसत आहे. ठाण्यातील एक जोडपे देखील असेच गेले तीन दिवस नेदरलँड मधील अॅमस्टरडॅम शहरातील विमानतळावर अडकून पडले आहेत.
नवीन राणा बुरीचा आणि त्यांची पत्नी जयश्री यांनी भारतात परतण्यासाठी अॅमस्टरडॅम येथून प्रयाण केले. पण, लँडिंग पासून अवघ्या 4 तासांवर विमान आलेले असताना या विमानाला भारतात उतरण्याची परवानगी नाकारण्यात आली व विमान पुन्हा अॅमस्टरडॅम येथे वळविण्यात आले. बुरीचा दाम्पत्य आणि त्यांच्यासोबत अनेक भारतीय नागरिक गेले तीन दिवस अॅमस्टरडॅम विमानतळावर ही सर्व मंडळी बसलेली असून नवीन बुरीचा यांनी एका व्हिडिओ मेसेजद्वारे आपली कैफियत मांडली आहे. या व्हायरसचा हाहाकार जगात पसरला असल्याने ही मंडळी तिथेच अडकून आहेत. त्यांनी भारत सरकारला आपणासर्वांना भारतात परत नेण्याची पर्यायी व्यवस्था करावी, अशी कळकळीची विनंती केली आहे.
हेही वाचा - कोरोना इफेक्ट : घरातल्या घरात केले 'लग्न', कल्याणातील नव वधू-वरांचा समाजासमोर आदर्श