ठाणे - जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रापंचायतीच्या निवडणुका भिवंडी तालुक्यात होत्या. त्यातच भिवंडीतील चार ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचार काळातच ४ गंभीर गुन्हे घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. मात्र, या चारही ग्रामपंचायतीचे निकाल धक्का देणारे लागल्याने दादागिरी करून राजकारण चालत नसल्याचे मतदारांनी दाखून दिले आहे.
हेही वाचा - उल्हासनगरात कार्यकर्त्यांनी बंद पाडला 'छमछम'
काल्हेरच्या शिवसेना शाखा प्रमुखावर प्रचारादरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात शुटरनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली होती. ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून गोळीबार झाल्याचा आरोप काल्हेर गावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख दिपक म्हात्रे यांनी केला होता. तर, पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या ३ आरोपींना अटक केली. मात्र, आजचा निकाल पाहता या ठिकाणी शिवसेनेची सत्ता असलेल्या काल्हेर ग्रामपंचायतीवर भाजपने कब्जा केला. या ठिकाणी सर्वच भाजपचे उमेदवार निवडणून आले.
दुसऱ्या घटनेत भाजप - शिवसेनेत रक्तरंजीत राडा
गुंदवली गावात ग्रामपंचायत निवडणुकीवरून भाजप - शिवसेना कार्यकर्त्यांच्या दोन गटामध्ये रक्तरंजित राडा झाला होता. या दोन्ही गंभीर गुन्ह्यांची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात दाखल करून दोन्ही गटातील राडेबाजांना अटक केली. मात्र, या ठिकाणी शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखून भाजपच्या पॅनलचा धुव्वा उडविला. विशेष म्हणजे, शिवसेनेचे ग्रामीण भागातील बडे नेते बाळा मामा याच गावातील रहिवासी आहेत.
तिसऱ्या घटनेत महिला उमेदवाराची जाळली होती कार
खारबाव ग्रामपंचायत हद्दीत एका महिला उमेदवाराची चारचाकी वाहन जाळून मतदारांमध्ये भीती निर्माण केल्याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, ही महिला उमेदवार निवडून आली. शिवाय महिलेचे राष्ट्रवादीचे पॅनल असलेले खारबाव विकास आघाडीचे संपूर्ण उमेदवार निवडून येऊन या ठिकाणी शिवसेना व भाजपला जोरदार झटका दिला.
चौथ्या घटनेत तर चक्क निवडणूक कार्यालयातच हाणामारी
निवडणूक कार्यालयातच चक्क दोन्ही उमेदवारांनी जोरदार राडा केला होता. दोन्ही उमेदवार निंबवली ग्रामपंचायत निवडणुकीला उभे होते. त्यामध्ये राष्ट्रवादीचे गणेश गुळवी, तर शिवसेनेकडून प्रवीण गुळवी यांच्या पॅनलमध्ये थेट लढत होती. मात्र, प्रचारादरम्यान शिवसेनेचे प्रवीण गुळवी यांच्या गटातील काही कार्यकर्त्यांनी गावात बेकायदा बॅनर लावल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे गणेश गुळवी हे भादवड येथील निवडणूक कार्यालयात तक्रार करण्यासाठी गेले होते. त्यावेळी दोघांमध्ये अचानक कार्यालयातच वाद होऊन वादाचे रुपांतर हाणामारीत झाले होते. या वेळी दोन्ही गटातील कार्यकर्ते आमनेसामने येत तुफान हाणामारी झाली होती. मात्र, या ठिकाणीही शिवसेनेचे पॅनल पराभूत होऊन राष्ट्रवादीचे पॅनल विजयी ठरले. तर, दुसरीकडे भिवंडी तालुक्यात एकूण ५६ ग्रामपंचयातींच्या निवडणुकीसाठी ५७४ उमेदवारांपैकी ३ ग्रामपंचायती बिनविरोध होऊन, तालुक्यात एकूण १०८ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.
हेही वाचा - ठाण्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ..