ठाणे - गेल्या आठवड्यात मनसे पदाधिकारी आणि आरटीआय कार्यकर्ते जमील शेख यांची हत्या झाली होती. हत्या करून पोबारा करणाऱ्या आरोपींचा बायोडाटा ठाणे पोलिसांच्या हाती पडला आहे. या प्रकरणात आरोपींना गाडी पुरविणारा आणि इच्छितस्थळी पोहोचविणारा आरोपी शाहिद शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच ठाणे पोलिसांच्या तीन टीम उत्तरप्रदेशात शूटरांचा शोध घेत आहेत.
ठाणे पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, गुरुवारी जमील हत्या प्रकरणात शाहिद शेख याला ठाणे पोलिसांनी अटक केली. यानंतर जमील हत्याकांडाचा खुलासा होत गेला. अटक करण्यात आलेल्या शाहिद शेखने आरोपींना सोडण्यासाठी मदत केली. तसेच दुचाकीदेखील पुरविल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्या चौकशीत जमीलची हत्या करणारे आरोपी हे उत्तरप्रदेशातील असल्याची माहिती आहे. यानंतर ठाणे पोलिसांच्या तीन टीम आरोपी शूटर यांच्या शोध घेण्यासाटी उत्तरप्रदेशात दाखल झाल्या आहेत.
हेही वाचा - मार्शल आर्ट्सचा बादशहा ब्रूस लीच्या आठवणींना उजाळा
तीन पथके उत्तरप्रदेशात -
ठाणे पोलिसांची तीन पथके उत्तरप्रदेशात पोहोचली आहे. यात गुन्हे शाखा, खंडणीविरोधी पथक आणि राबोडी पोलिसांचे एक पथक यांच्या समावेश आहे.
प्रवीण दरेकरांची प्रतिकिया -
समाजसेवक आणि मनसे कार्यकर्ते जमील शेख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी तसेच या प्रकरणी सखोल चौकशी करून खऱ्या सूत्रधारांना गजाआड करावे, अशी विनंती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना केली आहे. ठाण्यात कायदा सुव्यवस्थेबरोबरच शांतता कायम राहावी, यासाठी त्यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला तसेच या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास पूर्ण करण्याची विनंती केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून खऱ्या सूत्रधारांना गजाआड करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.