ठाणे - शहरातील वाढीत गुन्हेगारी, भुरट्या चोऱ्या, घरफोड्या आदींना आळा घालण्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तालयाकडून शहरातील महत्त्वाच्या चौकात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. मात्र, यापैकी बहुतांश सीसीटीव्ही हे कार्यान्वित नसल्याचे समोर आले. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पत्रव्यवहारकरून प्रशासनाला इशारा दिला होता. अद्याप त्यात सुधारणा न झाल्याने आज मनसेचे शिष्टमंडळ आयुक्तांच्या भेटीसाठी आले होते. त्यांची आणि आयुक्तांची भेट झाली नाही. गुरुवारपर्यंत सीसीटीव्ही आणि वायफाय कार्यान्वित न झाल्यास आम्ही त्याची विल्हेवाट लावू, असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.
कोट्यावधींचा खर्च करून उपयोग काय?
सीसीटीव्हीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, अनेक ठिकाणी हे कॅमेरे बंदच आहेत. दक्ष आणि ज्येष्ठ नागरिकांनी देखील हे कॅमेरे बंद असल्याच्या तक्रारी दिल्या आहेत. याबाबत महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याशी संपर्क साधून पत्रव्यवहार केला. त्यांनी संबंधित अधिकाऱयांना कॅमेरे दुरुस्तीचे आदेश दिले. मात्र, अद्याप परिस्थिती 'जैसे थे'च आहे. असा आरोप मनसेने केला आहे.
गुन्हेगारांना मिळत आहे अभय -
ठाण्याच्या नऊ प्रभाग समितींमध्ये पालिका प्रभाग सुधार निधीतून १ हजार २०० तर वायफाय योजनेतून १०० असे एकूण १ हजार ३०० सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. लॉकडाऊननंतर चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. रस्त्यावर सोनसाखळी खेचणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. गुन्हेगारांना बंद सीसीटीव्हीमुळे अभय मिळत आहे.