ठाणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या दणक्यानंतर वैशाली लाहोरी या महिलेला अखेर न्याय मिळाला. मनसे जिल्हाध्यक्ष अविनश जाधव यांनी आज (शुक्रवारी) पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त हेरवाडे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मोरे आणि इतर नेते आणि कार्यकर्तेही उपस्थित होते.
केवळ आडनाव सारखेच असल्याने पीडित महिलेला दुसऱ्याच महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल देण्यात आला होता. नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या या महिलेला ठाण्यातील छत्रपती शिवाजी हॉस्पिटल येथून मुंबईच्या नायर हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले. मात्र, तिथे हा सगळा गोंधळ लक्षात आल्यावर तिला पुन्हा ठाण्यात आणण्यात आले. तिची व्यथा ऐकून मनसेच्या अविनाश जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सदर महिलेला उशिरा रात्री येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यास भाग पाडले.
आता मनसेने पुढाकाराने पीडित महिलेचा पुढील सर्व उपचार ठाण्यातील पाणंदीकर हॉस्पीटल येथे होणार आहेत. तसेच त्यासाठीचा संपूर्ण खर्च ठाणे महापालिकेकडून करण्यात येणार आहे, अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली.