ठाणे - तीन दिवसांपूर्वी अचानक घरातून बेपत्ता झालेल्या रिक्षा चालक तरुण विवेक खरात (२५) यांचा मृतदेह वाघबीळ रेतीबंदर वाघबीळ ठाणे (प) येथे रविवारी दुपारी सापडला. घटनास्थळी पालिका आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाचे जवानांनी मृतदेह बाहेर काढून कासारवडवली पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केला. ५ नोव्हेंबरला विवेक बेपत्ता झाला होता.
५ तारखेला झाला होता बेपत्ता
मृतक विवेक खरात (२५) जुनी म्हाडा कॉलोनी, स्वामी विवेकानंद नगर, वसंत विहार, ठाणे हा रिक्षा चालक असून एक वर्षापूर्वीच त्याचा विवाह झाला होता. ५ नोव्हेंबर (गुरुवार) रोजी रात्री अचानक विवेक हा घरातून गायब झाला. त्याचा शोध घेतल्यानंतरही तो सापडला नव्हता. त्यामुळे कुटुंबीयांनी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.
आपत्ती निवारण पथकाने बाहेर काढला मृतदेह
शोध सुरू असताना ५ नोव्हेंबरच्या रात्री काल्हेर खाडी जवळ रिक्षा सापडल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली होती. मात्र, विवेकचा शोध लागला नाही. अखेर रविवारी ८ नोव्हेंबर रोजी विवेकचा मृतदेह वाघबीळ रेतीबंदर खाडीत दिसला. सदरची माहिती पालिका आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख संतोष कदम याना मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाचे जवान पोहचले त्यांनी खाडीतील मृतदेह बाहेर काढला आणि तो कासारवडवली पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केला. कासारवडवली पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात पाठविला. याबाबत अधिक तपास चितळसर पोलीस करीत आहेत.