ठाणे - शहरात अनेक समस्या असतात. परंतु ठाणेकर सद्या एका वेगळ्या समस्येने परेशान आहेत. ठाणे शहराच्या हद्दीत दिवसाला ८० ते १०० जणांना भटके कुत्रे चावा घेत आहे. निधीअभावी मागील वर्षभरापासून भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण रखडले असल्याचीही बाब समोर आली आहे. तसेच रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांची संख्या लाखोंच्या घरात गेली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेली आठ महिने ठाणे पालिकेने कोरोनावर लक्ष केंद्रीत केले असल्याने या समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे.
भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली -
कोरोनामुळे मार्चपासून लॉकडाउन लावण्यात आले. त्यामुळे अनेक कामे रखडली आहे. ठाणे पालिकेनेही फक्त कोरोनावर लक्ष केंद्रीत केले आहे. परंतु आता भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे पालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे. हे भटके कुत्रे कधी गाड्यांच्या मागे लागतात, तर कधी अंगावर धावून येतात. तसेच झुंडीने हल्ला करणे, लहान मुलांच्या तसेच रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांच्या अंगावर धावणे, अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांची दहशत वाढू लागली आहे.
निवेदने देऊनही कारवाई नाही -
याबाबत ठाणे महानगरपालिकेला अनेक वेळा निवेदने दिली आहेत. पण यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. पालिकेच्या अधिकाऱ्यांनुसार आम्ही निर्बिजीकरण करतो. परंतु भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ठाणे शहरात अंदाजे जवळपास दीड लाख एवढी भटक्या कुत्र्यांची संख्या असण्याची शक्यता आहे. या आकडेवारी नुसार २०२१ मध्ये ठाणे पालिका हद्दीत जवळपास २७ लाख कुत्र्यांची संख्या होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा - मुंबईच्या लालबाग गणेशगल्ली परिसरातील साराभाई इमारतीला आग; १६ रहिवासी जखमी