ठाणे : कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी पोलीस ठाण्यात ६३ वर्षीय वयोवृद्धांच्या दीपक भिंगारदिवे यांचा संशयास्पद मृत्यू पोलीस ठाण्यात झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दीपक संभाजी भिंगारदिवे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून मृत दीपक यांची पत्नी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आहे. तर या घटनेबाबत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. त्यामुळे हे प्रकरण चांगलंच तापलं आहे.
ऑल आउट ऑपरेशन : ठाणे जिल्ह्यात काही महिन्यापासुन गुन्हेगाऱ्यांच्या कारवाया वाढतच असल्याने जिल्ह्यातील शहरी भागात गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी ऑल आउट ऑपरेशन राबवली जात आहे. त्यातच काल (शुक्रवारी) कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑल आउट ऑपरेशन राबवण्यात आले होते. त्यावेळी प्रितेश भिंगारदिवे या २३ वर्षे तरुणाला कोळशेवाडी पोलिसांनी ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली. याच दरम्यान मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती प्रितेशचे वडील दीपक भिंगारदिवे यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी थेट कोळशेवाडी पोलीस ठाणे गाठले. तिथे काही वेळाने त्यांचा अचानक मृत्यू झाला.
पोलिसांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप : पोलिसांनी त्यांना मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप भिंगारदिवे यांच्या कुटुंबीयांनी केला. तर, प्रितेश याची चौकशी सुरू असताना मृतक दीपक भिंगारदिवे हे मोबाईलमध्ये त्याची चित्रीकरण करत होते. त्यामुळे त्यांना पोलिसांनी थांबवले. पोलीस ठाण्यातील अंमलदार कक्षाच्या शेजारी बसवून ठेवले. याच दरम्यान त्यांना फिट आल्यानंतर त्यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याचे पोलीस उपायुक्त संजय गुंजाळ यांनी सांगितले. तसेच भिंगारदिव्यांच्या कुटुंबियांनी केलेले आरोप पोलिसांनी फेटाळून लावले आहेत. यासंबंधीचे सर्व सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून या प्रकरणी सीआयडी चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सांगितले.
सीआयडीमार्फत चौकशी : न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग यांनी मृत दीपक भिंगारदिवेंचा पंचनामा, शवविच्छेदन करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी ठाणे यांना दिले आहेत. इंटरेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम हे व्हिडिओ शूटिंगमध्ये करण्यात येणार आहे. शिवाय या संपूर्ण प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात येणार असून माननीय न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग स्वतंत्र चौकशी करतील, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा भिंगारदिवे यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. दीपक यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात पाठवला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येईल. दरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याने दीपक यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला. मात्र पोलिसांनी हे सगळे आरोपी फेटाळले आहेत. याप्रकरणी आता सीआयडी चौकशी केली जाणार असल्याचा पोलिसांनी स्पष्ट केलंय.