ठाणे- जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले असून देशासह राज्यातही कोरोनाचे संशयीत रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारी भिवंडीतदेखील कोरोनाचा संशयीत रुग्ण आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. या रुग्णास कोरोनाच्या संशयावरून पुढील उपचारासाठी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
भिवंडीतील ६० वर्षीय महिला मागील आठवड्यात नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी पुण्यात गेली होती. दोन दिवसांपूर्वी ती भिवंडीत आल्यानंतर त्यांना सर्दी, खोकला, आणि श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्या स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी गेल्या होत्या. मात्र, प्रकृतीत फरक पडत नसल्याने बुधवारी त्या भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी गेल्या असता येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सदर महिलेस कोरोना विषाणूचा संशय वाटल्याने तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात पाठविले, अशी माहिती स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कोरोनाचा संशयीत रुग्ण भिवंडीसारख्या कामगार नगरीत आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, सदर महिलेस कोरोना विषाणूच्या संशयावरून पुढील उपचारासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुबईला हलविण्यात आले आहे. कोरोना संदर्भातील रक्त तपासणी अहवाल उद्या येणार असल्याने रक्त तपासणी अहवालावरूनच खरे काय ते समजेल. मात्र, सध्या भिवंडीतील नागरिकांनी याबाबत घाबरून जाऊ नये, तसेच प्रत्येक नागरिकाने खबरदारीचा उपाय म्हणून दैनंदिन जीवनात काम करतांना व वावरताना याबाबत खबरदारी घेणे महत्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल थोरात यांनी दिली.
हेही वाचा- 'तुम्ही कृतघ्न आहात..! शरद पवार तर स्वत: बाप झालेत'