ठाणे: मुंब्रा डोंगरावर असलेल्या अनधिकृत बांधकामांची वनविभागाकडून अलीकडेच पाहणी करण्यात आली. मात्र, मशिद व दर्ग्याचे सर्वेक्षण करून योग्य ती कारवाई करण्यात यावी यावर मनसे ठाम आहे. डोंगरावरील सर्वच अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात यावीत यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने आज (सोमवारी) ठाणे उपवनसंरक्षकांची भेट घेतली. प्रशासनाने कारवाई न केल्यास तेथे गणेश मंदिर उभारण्याचा इशारा मनसेतर्फे देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासनाला या संदर्भात सर्वेक्षण करावे लागले आहे.
अनधिकृत दर्ग्यांवर मनसेची वक्रदृष्टी: शिवाजी पार्क येथील मैदानात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगली आणि मुंबईतील समुद्रात उभारण्यात आलेल्या अनधिकृत मजारीचे वास्तव समोर आणले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रशासनाने दोन्ही ठिकाणी कारवाईचा बडगा उगारत दोन्ही मजार जमीनदोस्त केल्या. यानंतर राज्यभर मनसैनिकांनी आपापल्या विभागातील अनधिकृत दर्गे, मशिदीविरोधात आवाज उठवला होता. ठाणे शहर मनसेनेही दोन दिवसांपूर्वी मुंब्रा डोंगरावरील अनेक बेकायदा दर्ग्यांचा पर्दाफाश करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. ही जागा वनविभागाची असल्याने मनसेच्या तक्रारीची दखल घेत वनविभागाने तातडीने मुंब्रा डोंगरावरील बांधकामांची पाहणी केली होती. मात्र, कारवाईचा बडगा न उगारल्याने सोमवारी मनसे नेते अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे आणि मनसैनिकांच्या शिष्टमंडळाने उपवनसंरक्षक संतोष सस्ते यांची भेट घेतली.
शांतता भंग नकोच पण कारवाई करा: या भेटीनंतर वनाधिकाऱ्यांनी मुंब्रा डोंगरावरील सर्वच अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात येईल, असे आश्वासित केल्याचे मोरे यांनी सांगितले. मुस्लीम बांधवांचा रमझान महिना सुरू असल्याने आम्हाला कोणतीही शांतता भंग करायची नाही, असे स्पष्ट करून रविंद्र मोरे यांनी, येणाऱ्या धमक्यांना आम्ही भीक घालत नसल्याचे सांगितले.
अनधिकृत बांधकामावरती कारवाई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उद्बोधनानंतर 23 मार्च, 2023 रोजी माहीम दर्ग्याजवळ एका मुस्लिम मजारीच्या बाजूला असलेल्या अनधिकृत बांधकामावरती तातडीने कारवाई करण्यात आली होती. मुस्लीम धर्मीयांमध्ये एखाद्या व्यक्तीच्या मृत्यू झाल्यावर त्याला त्या ठिकाणी दफन केले जाते. त्याला, मजार असे बोलले जाते. मात्र, ज्या ठिकाणी कारवाई झाली ते ठिकाण मुस्लीम धर्मियांसाठी पवित्र असे स्थळ होते, अशी माहिती मुस्लीम धर्मीय नागरिकांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा: Amritpal Singh Case: अमृतपालचा बंदूकधारी अमृतसरमधून अटक, डिब्रूगडला रवानगी