पुणे - बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार दुर्लब वंचित घटकातील विद्यार्थ्यांना पहिलीच्या प्रवेशासाठी 25 टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहेत. तसेच शैक्षणिक साहित्य मोफत पुरवले जाणे बंधनकारक आहे. मात्र, हे नियम महापालिकेच्या शाळेत पाळले जात नसल्याच्या निषेधार्थ शनिवारी दुपारच्या सुमारास केडीएमसी मुख्यालयावर विद्यार्थ्यांसह पालकांनी चड्डी-बनियन मोर्चा काढला होता.
समाजातील वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी 'आरटीई'च्या कायद्यानुसार २५ टक्के आरक्षणांतर्गत प्रवेश दिला जातो. मात्र, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील बहुतांश शाळांकडून या कायद्याची पायमल्ली होत आहे. तसेच आरटीईअंतर्गत २५ टक्के प्रवेशित मुलांना शिक्षण व शैक्षणिक साहित्य मोफत देणे बंधनकारक आहे. असे असतानाही काही शाळा शैक्षणिक साहित्य मोफत देण्यात असमर्थतता दर्शवली. पैशांची मागणी करीत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या अनागोंदी कारभाराविरोधात शिक्षण आरोग्य अधिकार मंच यांनी पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केले होते. मात्र, पालिका प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली गेली नाही. यामुळे अखेर अध्यक्ष नितीन तावडे यांच्या नेतृत्वाखाली पालकांनी व मुलांनी चड्डी बनियन मोर्चा काढला होता. या मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातून भर पावसात सुरू करण्यात आली होती. हा मोर्चा पालिका मुख्यालयावर धडकला यावेळी पालिकेच्या शिक्षण मंडळ विभागाच्या कारभाराच्या नावाने तीव्र निषेध करीत घोषणाबाजीही करण्यात आली.