ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील पदपथावरील अतिक्रमणे हटविण्याच्या दृष्टीने 1 नोव्हेंबरपासून पदपथावरील अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम सुरू करण्याचे निर्देश यापूर्वीच पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांना दिले होते. त्याअनुषंगाने सर्व प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांनी त्यांचे संबंधित प्रभागक्षेत्रात पदपथावरील अतिक्रमणे हटविण्याची धडक मोहीम सुरू केली. मात्र या कारवाईला फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे कारवाईवेळी अ प्रभाग क्षेत्रातील एनआरसी कंपनी समोरील मोहने गेट परिसरातील फेरीवाल्यांनी अतिक्रमण पथकाला शिवीगाळ करीत कारवाईत अडथळा आणला आहे. त्यामुळे या भागात कारवाई काही काळ थांबली होती. मात्र प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांचे अधिपत्याखाली अतिक्रमणविरोधी पथकाने त्यांनतर शहाड, आंबिवली, मोहने, बल्यानी, टिटवाळा स्टेशन रोड परिसरात सुमारे 15 टपऱ्या, 14 हातगाड्या, 17 शेड, 6 बाकडे हटविण्याची कारवाई केली.
हातगाड्या उचलून दंड आकारण्याची कारवाई -
‘ब’ प्रभाग क्षेत्रात प्रभागक्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते यांच्याही पथकाने गोल्डन पार्क ते खडकपाडा सर्कल, संदीप हॉटेल- भोईरवाडी-बिर्ला कॉलेज रोड, भवानी चौक येथील पदपथावरील अतिक्रमणे, दुकानाचे वाढीव घातलेले बांबू काढण्याची कारवाई केली. तसेच ‘क’ प्रभाग क्षेत्रातही प्रभागक्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांच्या पथकाने दीपक हॉटेल, पुष्पराज हॉटेल, छाया टॉकीज, शिवाजी चौक, बोरगावकरवाडी परिसर येथे पदपथावरील सुमारे 70 शेड व 2 टपऱ्या निष्कासनाची कारवाई केली. तर डोंबिवली विभागातील 'फ;' प्रभागात प्रभागक्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांच्या पथकाने नेहरू रोड, फडके रोड, मानपाडा रोड या वर्दळीच्या रस्त्यावरील सुमारे 20 शेड, पदपथावरील स्टेचू तसेच दुकानाचे पुढे आलेले शेड तोडण्याची कारवाई केली. 'इ' प्रभागात प्रभागक्षेत्र अधिकारी किशोर ठाकूर यांच्या पथकानेही एमआयडीसी निवासी विभाग, कल्याण शीळ रोड, कावेरी चौक या परिसरातील पदपथावरील पुढे आलेले शेड निष्कासित केल्या व हातगाड्या उचलून दंड आकारण्याची कारवाई केली.
पदपथ मोकळा होईपर्यंत सुरू राहणार कारवाई -
कल्याण पूर्वेतील 'जे' प्रभाग क्षेत्रात प्रभाग अधिकारी भरत पाटील यांचे पथकाने तीसगाव रोड, पुना लिंक रोड, म्हसोबा चौक,गणपती चौक या परिसरातील पदपथावरील टपऱ्या, दुकानांच्या पुढे आलेल्या शेड्स काढण्याची कारवाई केली. 'डोंबिवली पूर्वेतील ग' प्रभाग क्षेत्रात प्रभाग अधिकारी स्नेहा करपे यांचे पथकाने आयरे रोड, राजाजी पथ येथील टपऱ्या व हात गाड्यावर कारवाई केली, डोंबिवली पश्चिम मधील 'ह' प्रभागात प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पवार यांचे पथकाने महात्मा गांधी रोडवर पदपथावर लावलेल्या दुकानांवर कारवाई केली व वाढीव शेड्स काढण्याची कारवाई केली दरम्यान, ही कारवाई कल्याण डोंबिवलीतील पदपथ जोपर्यत मोकळा श्वास घेत नाही. तोपर्यत अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम सुरूच राहणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.