ठाणे - कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी कचऱ्याच्या टर्मिनल डंपिंगजवळील भिंतींच्यालगत एक ८ फुटांच्या सापाने उंदराच्या बिळात शिरून एका उंदराला पकडले. यावेळी आवाज ऐकू आल्याने याठिकाणी काम करणाऱ्या कामगारांनी व कचरावेचक मुलांनी धाव घेतली. तर त्यांची भीतीने गाळणच उडाली. हे दृश्य पाहतच सर्वानीच या ठिकाणावरुन पळ काढली.
कचरावेकच मुले आज दुपारच्या सुमाराला डंपिंगवरील कचरा वेचत होते. त्याचवेळी त्यांच्या कचऱ्याच्या गोणी खालून उंदराच्या बिळात भलामोठा साप शिरला होता. यामुळे मुलांनी आरडाओरड केल्याने याठिकाणी काम करणाऱ्या कामगारांनी धाव घेतली. त्यावेळी हा साप बिळातून उंदराला भक्ष्य करून बाहेर पडत होता. हे पाहून कामगारांची पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती. त्याच सुमाराला तेथील काम करणाऱ्या आदेश विशे यांनी वार संस्थेचे सर्पमित्र दत्ता बोबे यांना संपर्क करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र दत्ता यांनी घटनास्थळी येऊन हा साप उंदराला भक्ष्य करीत असतानाच पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, साप भक्ष्य सोडण्यास तयारच नव्हता. त्यामुळे सापाने भक्ष्य गिळल्यानंतर त्याला पकडून सोबत आणलेल्या कापडी पिशवीत बंद केला. साप पकडल्याचे पाहून कामगारांसह कचरावेचक मुलांनी सुटेकचा निःश्वास घेतला. हा साप धामण जातीचा असून वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने निसर्गाच्या सानिध्यात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्र दत्ता यांनी दिली.
हेही वाचा - कल्याणमध्ये आढळला दुर्मिळ दुतोंड्या साप