ठाणे : भक्ष्याच्या शोधात सात फुटाचा साप कबुतरांच्या पिंजऱ्यात घुसल्याची घटना घडली ( Snake found in pigeon cage ) आहे. या भल्यामोठ्या सापाने पिंजऱ्यातील कबुतरांच्या पिल्लांना फस्त केल्याने तो पिंजऱ्यातच सुस्त झाला. ही घटना कल्याण पश्चिम भागातील वाडेघर गावातील एका कबुतर पालन केंद्रात घडली आहे.
साप अचानक कबुतरांच्या पिंजऱ्यात - बदलत्या हवामान व शेती जंगल भागात मोठमोठी गृहसंकुल झपाट्याने उभी राहत आहे. त्यामुळे विषारी बिन विषारी साप भक्ष्याच्या शोधात मानवीवस्तीत शिरत असल्याच्या घटना घडत आहे. अशाच एका घटनेत सात फूट लांब असलेला साप वाडेघर गावातील दळवी यांच्या कबुतर पालन केंद्रात भक्ष्याच्या शोधात शिरला होता. दळवी हे कबुतरांसाठी आज सकळाच्या सुमारास दाणे टाकण्यासाठी गेले असतानाच, अचानक त्यांना साप कबुतरांच्या पिंजऱ्यात दिसताच त्यांनी बाहेर पळ काढला.
साप धामण जातीचा - त्यानंतर सर्पमित्र दत्ता बोंबे यांना संर्पक करून साप पिंजऱ्यात वेटोळ्या मारून बसल्याची माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र बोंबे हे घटनास्थळी येऊन या सापाला कबुतरांच्या पिंजऱ्यातूनच शिताफीने पकडून पिशवीत बंद केले. साप पकडल्याचे पाहून कबुतरपालन केंद्राच्या मालकांसह येथील कामगारांनी सुटकेचा निश्वास घेतला. हा साप धामण जातीचा असून याची माहिती कल्याण वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊन या सापाला आज सायंकाळी निर्सगाच्या सानिध्यात सोडल्याची माहितीही सर्पमित्र बोंबे यांनी दिली आहे. तसेच बदलत्या हवामानामुळे साप मानवी वस्तीत शिरल्यास तत्काळ त्याची माहिती सर्पमित्रांना देण्याचे नागरिकांना सर्पमित्र बोंबे यांनी आव्हान केले आहे.