ठाणे - डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी परिसरातील एका बार वजा कॅन्टीनमध्ये दारू पीत बसललेल्या ६ जणांच्या टोळक्याचा एका तरुणासोबत क्षुल्लक वाद झाला होता. त्यांनतर तरुण व त्याचा मित्र मध्यरात्रीच्या सुमारास बारमधून घारडा सर्कल एमआयडी रस्त्यावरून घरी पायी जात असताना वाद झालेल्या त्या टोळक्याने मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करीत त्याची कार खाली चिरडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करीत त्या टोळक्याला सीसीटीव्हीच्या आधारे मानपाडा पोलिसांनी डोंबिवलीतील आजदे गावात राहणाऱ्या सहा जणांच्या टोळक्याला अटक केली आहे. सचिन पाटील, विनोद म्हात्रे, विनय लंके, निखिल सावंत, विक्रांत तांडेल आणि रोहित गुरव असे हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे असून सर्व २० ते २५ वयोगटातील आहेत. तर शशांक महाजन असे बारमधील वादातून हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
शशांकचा उपचारापूर्वीच मृत्यू
डोंबिवली एमआयडीसीमध्ये एका बार वजा कॅन्टीनमध्ये काल रात्रीच्या सुमारास काही तरुण दारूची पार्टी करण्यासाठी बसले होते. याच बारमध्ये पेंडसेनगर परिसरात राहणारा शशांक आणि त्याचा एका मित्रसोबत दारूची पार्टी करायला बसला होता. या दरम्यान आरोपींच्या पैकी एकाशी त्याचा वाद झाला. या वादानंतर मृतक शशांक आपल्या मित्रासोबत घरी जाण्यासाठी निघाला होता. विशेष म्हणजे त्याने घरी जाण्यासाठी ओला कार बूक केली होती. मात्र, बराच वेळ झाला ओला कार येत नसल्याचे पाहून हे दोघे पायी घराकडे निघाले होते. मात्र, ज्या तरुणासोबत शशांकचा वाद झाला होता. ते तरुण ५ मित्रांसह एका लाल रंगाच्या कारमध्ये बसून शशांकचा पाठलाग करीत आले. आधी शशांकला वाटले ती त्याने बुक केलेली ओला कार येत आहे. मात्र, त्या कारमध्ये सहा आरोपी बसले होते. या तरुणांनी शशांक आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण करून शशांकला रस्त्यावर पाडले. त्यांनतर कार त्याच्या डोक्यावर नेऊन गंभीर जखमी करून ते सहा जण कारमध्ये बसून पळून गेले. मानपाडा पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस अधिकारी सुरेश डांबरे यांचे पथक घटनास्थळी पोहचले आणि पोलिसांनी गंभीर जखमी शशांकला पोलिसांनी आपल्या व्हॅनमध्ये टाकून अत्यंत वेगाने ते रुक्मिणीबाईला पोहचले. मात्र व्हॅन रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच शशांकचा मृत्यू झाला.
सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपी तीन तासातच गजाआड
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा हरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला असता घटना घडलेल्या एका ठिकाणच्या सीसीटीव्हीमध्ये लाल रंगाची कार जाताना दिसली. याच कराच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश डांबरे आणि त्यांच्या पथकाला आरोपीचा सुगावा लागला. या प्रकरणी डोंबिवली एसीपी जे. डी. मोरे यांनी सांगितले की, घटना घडल्याच्या तीन तासाच्या आत आरोपी सचिन पाटील, विनोद म्हात्रे, विनय लंके, निखिल सावंत, विक्रांत तांडेल आणि रोहित गुरव यांना पोलिसांना बेड्य़ा ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार करीत आहेत.