ठाणे - शहरात विषारी घोणससह दोन कोब्रा नागांना पकडण्यात आले आहे. तसेच एका फ्रीजमधूनही लांबलचक सापाला सर्पमित्रांनी पकडल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे.
पहिल्या घटनेत कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी रोडवरील रितू रिवर पार्क हे मोठे ग्रह संकलन असून या साईटच्या आवारात एक कोब्रा आढळून आला. यानंतर याची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली. त्यानंतर सर्पमित्रांनी घटनास्थळी येऊन या कोब्रा नागाला पकडले. हा कोब्रा चार फूट लांबीचा असून इंडियन कोब्रा जातीचा आहे, दुसऱ्या घटनेत सापर्डे गावातील एका बंगल्याच्या आवारात नवीन पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. या टाकीत विशाल जातीचा साप शिरला होता. या विषारी घोणसला शिताफीने सर्पमित्र हितेशने पकडले.
तिसऱ्या घटनेत दुर्गाडी किल्ल्याच्या नजीक देवशिष सोसायटी आहे. या सोसायटीच्या जिन्याखाली अडगळी भागात कोब्रा नाग शिरला होता, त्यामुळे सोसायटीतील नागरिक जिन्यातून जाण्यासाठी घाबरत होते. सर्पमित्र हितेशने याही नागाला पकडून पिशवीत बंद केले. हा नाग साडेचार फुटाचा असून इंडियन कोब्रा जातीचा आहे. चौथ्या घटनेत रामबाग परिसरातील मधुरिमा स्वीट दुकान आहे. या दुकानावरील मजल्यावर घरातील फ्रीजमध्ये लांबलचक साप शिरल्याची माहिती सर्पमित्र हितेशला मिळाली होती. त्यानंतर त्याने घटनास्थळी पोहचून या सापाला पकडले. सर्पमित्र हितेशने आज दिवसभरात तीन विषारी आणि तीन बिनविषारी साप पकडण्यात आले आहेत.
दरम्यान, कल्याणमधून गेल्या चार दिवसात सर्पमित्रांनी तब्बल 35 विषारी आणि बिनविषारी सापांना मानवी वस्तीतून पकडून जंगलात सोडल्याने त्यांना जीवदान मिळाले आहे. तसेच आज पकडलेल्या 6 सापांना वन अधिकाऱ्याची परवानगी घेऊन जंगलात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्र हितेश यांनी दिली आहे.