मीरा भाईंदर(ठाणे)- भाईंदर पश्विम परीसरात असलेल्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयाच्या आवारात चक्क रुग्णवाहिकेत बसून मद्य पार्टी करणाऱ्या सहा व्यक्तींविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे सदर व्यक्ती दारू पित असल्याची माहिती खुद्द शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी फोनद्वारे भाईंदर पोलिसांना दिली.
पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या आवारात सतत रुग्णवाहिका उभ्या करण्यात येतात. परंतु, मंगळवारी रात्री ११.४५ च्या सुमारास एका रुग्णवाहिकेत बसून काही व्यक्ती मद्यसेवन करत असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलीस घटना स्थळी पोहचताच घटनास्थळी असलेले पत्रकार अनिल नोटियाल यांनी पोलिसाना रुग्णवाहिका दाखवली.
पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता ६ व्यक्ती मद्य सेवन करत असल्याचे आढळून आले.पोलिसांनी घटनास्थळी आरोपी समीर घाडगे, विलास मंजाडे, अजय खंडारे, रविशंकर गुप्ता, बाळकृष्ण माची आणि गौरव पासते यांना अटक केली. या मधील समीर घाडगे रुग्णवाहिकेचा चालक असून इतर औषध फवारणी विभागात कार्यरत आहेत. अजय भासकर यांच्या मुलीचा वाढदिवस असल्या कारणामुळे पार्टी करत असल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली.