ठाणे - संशयित कोरोनाग्रस्त इंजिनिअरने भरधाव ट्रेनखाली स्वतः ला झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली रेल्वे स्थानकानजीक घडली. बोनवली हरिहर दास (40) असे या इंजिनिअरचे नाव आहे. ते डोंबिवली पूर्वेतील आजदे गावातील रहिवासी होते.
नुकताच झाला होता कोरोना
डोंबिवली पूर्वेतील आजदे गावात राहणाऱ्या एक मृतदेह सोमवारी पहाटेच्या सुमारास 5 क्रमांकाच्या मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील 47/54 क्रमांकाच्या पोलजवळील रुळावर आढळला होता. लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पाठवून दिला. पोलिसांना संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्यात यश मिळविले. बोनवली दास हे दोन दिवसांपूर्वी कोरोना आजारावर उपचार घेऊन घरी परतले होते. त्यानंतर दम लागतोय म्हणून डॉक्टरकडे जाऊन येतो, असे पत्नी रोजालीन हिला सांगून बॅग घेऊन मध्यरात्री उशिरा ते घराबाहेर पडले होते. मात्र परत काही आले नाहीत. मात्र सोमवारी पहाटे 3.45च्या सुमारास त्यांचा मृतदेह रेल्वे रूळावर आढळून आला. या घटनेची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कोणार्क मेलच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले. ओळख पटल्यानंतर पत्नीने पतीचा मृतदेह ताब्यात घेतला.
आत्महत्येची घटना सीसीटीव्हीत कैद
मृतक बोनवली दास यांना दोन लहान मुले असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. बहुधा आजारपणाला कंटाळून त्यांनी जीवनाचा शेवट करून घेण्याचा विचार केला असावा, असा कयास बांधला जात आहे. या संदर्भात लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सिनिअर इन्स्पेक्टर सतीश पवार यांनी सांगितले, की दास दाम्पत्य मूळचे आसाम राज्यातील आहे. ते आजदेगावात राहणारे आहेत. मध्यरात्री दोन-अडीचच्या सुमारास डॉक्टरकडे जाऊन येतो असे पत्नीला सांगून बोनवली दास बॅग घेऊन घराबाहेर पडले होते. डोंबिवलीच्या प्लॅटफॉर्म क्र. 5वर बसलेल्या बोनवली दास यांनी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कोणार्क मेलखाली स्वतःला झोकून दिले. स्टेशन परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा घटनाक्रम आढळून आला. या संदर्भात मृत बोनवली यांची पत्नी रोजालीन दास यांच्या जबानीनुसार पती बोनवली यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते. या संदर्भात पत्नीने दिलेल्या जबानीवरून तशी नोंद घेण्यात आली असल्याचे सिनिअर इन्स्पेक्टर पवार यांनी सांगितले. तर बोनावली दास यांच्या निकटवर्तीयांनी याबाबतची माहिती दिली. बोनावली हे एका खासगी कंपनीत इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये नोकरी करत होते. इंजिनिअरिंगमध्ये ते खूप हुशार मानले जायचे. आदल्या दिवशी ते सोसायटीतील मेंबरसोबत होते. दम लागत असल्याने माझे काही खरे नाही, असे ते म्हणाले होते.