ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २६ रामबाग खडक प्रभागातून शिवसेनेचे उमेदवार सचिन बासरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक आयोगातर्फे शुक्रवारी त्यांना नगरसेवकपदाचे प्रमाणपत्र देण्यात आले.
सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आल्यावर नगरसेवकाचे नगरसेवकपद जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने या प्रभागात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र, या प्रभागातून एकच उमेदवार सचिन बासरे यांचा अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड निश्चित होती. तर इतर कोणीही उमेदवार नसल्याने आपला विजय घोषित करण्यात यावा, अशी मागणी सचिन बासरी यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यावर निवडणूक आयोगाला पत्र पाठवून बासरे यांचे नाव घोषित करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले होते.
त्यानुसार शुक्रवारी कल्याण पश्चिम विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तसेच प्रांत अधिकारी डॉक्टर नितीन महाजन यांच्या हस्ते सचिन भोसले नगरसेवक पदाची प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे रवी पाटील, वैजयंती घोलप-गुजर, नगरसेवक सुधीर बासरे हे उपस्थित होते.
सचिन बासरे यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेत सभागृहनेता म्हणून जबाबदारी याआधी सांभाळली आहे. एक अभ्यासू तसेच प्रशासनावर वचक असणारा प्रतिनिधी म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यामुळे या नगरसेवकपदाच्या कार्यकाळातही त्यांच्याकडून पूर्वीप्रमाणेच कामाची अपेक्षा केली जात आहे.