ठाणे - सेनेकडून विद्यमान खासदार राजन विचारे हे लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आपले नशीब आजमावत आहेत. राजन विचारे यांना मत म्हणजे मोदींना मत आणि मोदी पुन्हा पंतप्रधान होऊन पुन्हा एकदा एनडीएची सत्ता येणार असा दावा ठाण्याच्या आज झालेल्या मेळाव्यात महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला.
यावेळी जास्तीत जास्त मताधिक्यांनी युतीचा खासदार निवडून येणार असल्याचे संकेत युतीकडून देण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेशही देण्यात आले.
ठाण्यातून युतीचे उमेदवार विद्यमान खासदार राजन विचारे यांना आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांचे आव्हान असणार आहे. यासाठी युतीकडून आज ठाण्याच्या टीप टॉप हॉलमध्ये महायुतीचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे, भाजपचे राज्यसभेचे खासदार सहस्त्रबुद्धे, महायुतीचे आमदार तसेच दोन्ही पक्षाचे पद्धधिकारी उपस्थित होते.
यावेळी रिपाईचे कार्यकर्ते दिसून आले परंतु मंचावर रिपाईचे पदाधिकारी मात्र अनुपस्थित होते. या निवडणुकीत विरोधकांचे आव्हान पुन्हा पेलण्याचे आणि चांगल्या मताधिक्याने निवडणूक जिंकण्याचा निर्धार करण्यात आला.