मीरा भाईंदर (ठाणे) - शहरातील मुख्य रस्ते खड्डेमय झाले आहेत. याच मुद्द्यावरुन आज(रविवार) शिवसेनेच्या वतीने खड्डे भरो आंदोलन करण्यात आले. लवकरात लवकर खड्डे बुजवावे अन्यथा मनपा मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने यावेळी दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये झाडे लावून आंदोलन केले.
शहरातील अनेक रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय पक्ष तसेच सामाजिक संस्थांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेला लेखी पत्र देऊन खड्डे बुजवण्याची मागणी केली होती. यावर प्रशासनाने काही ठिकाणी दगड आणि माती टाकून खड्डे बुजवण्याचा दिखावा केला. मात्र हे रस्ते पुन्हा खराब झाले आहेत.
शहरातील मुख्य मार्ग काशी मीरा ते भाईंदर फाटक खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावर तारेवरची कसरत करत वाहन चालकांना आपले वाहन हाकावे लागत आहे. मनपा प्रशासनाकडे याची वारंवार तक्रार करून देखील दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे आज शिवसेनाकडून खड्डा भरो आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने लवकरात लवकर खड्डे बुजवावे अन्यथा मनपा मुख्य कार्यालयसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मीरा भाईंदर शिवसेनेने दिला आहे.
हेही वाचा - ५० लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण; पोलिसांच्या सावधगिरीने चौकडी गजाआड