ठाणे - ठाण्याला नगराध्यक्ष पी. सावळाराम, विधितज्ञ प्रभाकर हेगडे यांच्यासारख्यांचा वारसा लाभला आहे. तेव्हा, ठाणे लोकसभा मतदारसंघातून सुसंस्कृत उमेदवार आनंद प्रकाश परांजपे यांनाच दिल्लीला पाठवा, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. पवार यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा राखत नरेंद्र मोदींचे वाभाडे काढले. आगामी लोकसभेत नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील, तर ते केवळ खासदार म्हणून येतील, असे पवार यांनी सांगितले. शेवटची पाचच मिनिटे त्यांनी शिवसेनेवर भाष्य केल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी, रिपाईं महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची शुक्रवारी ठाणे मनपा मुख्यालयासमोरील रस्त्यावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी पालकमंत्री गणेश नाईक, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, रिपाईंचे (एकतावादी) नानासाहेब इंदिसे आदींसह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते.
५६ इंचाची छाती १२ इंचाची झालीय का?
पवार यांनी आपल्या ३६ मिनिटांच्या भाषणात मोदी सरकारचे वाभाडे काढताना नरेंद्र मोदी यांनी विकास या शब्दालाच तिलांजली दिल्याचे सांगितले. आगामी लोकसभेत नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील तर ते केवळ खासदार म्हणून येतील. तसेच मोदींना त्यांच्या ५६ इंचाच्या छातीबद्दल विचारून, कुलभूषण जाधवची सुटका करण्यासाठी अडीच वर्षे का लागली? आता तुमची छाती १२ इंचाची झालीय का? असा सवालही शरद पवार यांनी केला.
पवार म्हणाले, मागील दोन वर्षात १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आपण देशाचे कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, याची जाहीर कबुली देत पवार यांनी यावेळी दिली. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत यवतमाळमध्ये पोहचून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, तत्काळ शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटींचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला, असे पवार यांनी यावळी सांगितले.
देशात उद्योगांची अवस्था बिकट असल्याचे सांगताना ठाण्यातील वागळे इस्टेटमधून कारखाने गायब झाले अन् आता तेथे मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या. या इमारतींची नावे पण कधीही ऐकली नसतील अशी 'दोस्ती' ठेवली. गेल्या पाच वर्षात ठाण्यात एकही कारखाना का सुरू करू शकले नाहीत? असा सवाल करून अखेरच्या पाच मिनिटांत पवार यांनी शिवसेनेवर शरसंधान साधत उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टिका केली. तसेच, ठाण्यात दहशत माजवण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात आहे. हे गंभीर असून कुणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. आम्ही तुमच्या पाठीशी राहू, असे पवार यांनी आश्वासित केले.